कोरोनाबाधित झाले क्वारंटाईन; बंद घरातून लांबवला लाखोंचा ऐवज

कोरोना काळात या परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरोनाबाधित झाले क्वारंटाईन; बंद घरातून लांबवला लाखोंचा ऐवज
कोरोनाबाधित झाले क्वारंटाईन; बंद घरातून लांबवला लाखोंचा ऐवज

तुषार रौंदळ : विरगाव

येथील सटाणा-ताहाराबाद महामार्गावर राहणारे रघुनाथ तुळशीराम गांगुर्डे यांच्या राहत्या घराचा मागचा दरवाजाची लाकडी फळी कापून घरातील पाच लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल व किमती ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. रस्त्यालगत झालेल्या या चोरीमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

विरगाव येथील शेतकरी रघुनाथ तुळशीराम गांगुर्डे आपल्या कुटुंबासमवेत सटाणा-ताहराबाद रस्त्यालगतच्या शेतातील घरात राहतात. मात्र, रविवारी रघुनाथ गांगुर्डे यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल बाधित निघाल्यामुळे त्यांच्या एकत्रित राहत असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना अजमेर सौंदाणे येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंंटाईन करण्यात आले, परिणामी घराला कुलुप होते. मंगळवारी (दि.४) रात्री अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत पाठीमागील दरवाजाची लाकडी फळी कापून घरात शिरल्यावर स्टीलच्या डब्यातील अडीच लाख, सहा तोळे वजनाचे दोन सोन्याच्या बोरमाळ (सुमारे एक लाख ऐशी हजार रुपये किंमत), तीस हजार रुपये किंमतीचे दोन सोन्याचे डोरले, अठरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे तोंगल, पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे तोंगल, साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गाठले, सत हजार रुपये किमतीचे चांदीचे साखळी असे एकूण पाच लाख साठ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. बुधवारी (दि.५) सकाळी पुतण्या संदीप गांगुर्डे गुरांना चारा टाकण्यासाठी गेला असता चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर शेजारील नागरिकांना तसेच विरगावचे पोलीस पाटील यांना सांगितले. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती सटाणा पोलिसांना दिली.

कोरोना काळात वाढले चोर्‍यांचे प्रमाण

कोरोना काळात या परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सटाणा पोलीस ठाण्यात या घटनेच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा तपास सटाणा पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक किरण पाटील, रवींद्र भामरे, भास्कर बस्ते करीत आहेत.