कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण; आणखी २ आरोपींना अटक

कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. नांदेड आणि संभाजीनगरमधून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Cosmos Bank cyber fraud case
कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण

कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ला प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करुन ९४ कोटी रुपये लांबविण्यात आले होते. सायबर क्राईम सेलने औरंगाबाद येथून दोन जणांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कॉसमॉस बँकेचे ९४ कोटी रुपये लुटले

११ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटण्यात आले होते. याप्रकरणात सायबर क्राईम सेलने कारवाई केली. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय शेख मोहम्मद अब्दुल जब्बार, २२ वर्षाचा महेश राठोड या दोघांना अटक केली. याप्रकरणात याआधी दोन जणांना अटक करण्यात आली होती. भिवंडीत राहणाऱ्या २१ वर्षाच्या फहिम मेहफूज शेख आणि औरंगाबादमध्ये राहणाऱ्या फहिम अझीम खान यांना अटक केले होते. तर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाप्रकारे आरोपींवर केली कारवाई

कॉसमॉस बँकेवर टाकलेल्या सायबर हल्ल्यामध्ये ४१३ डेबिट कार्ड वापरण्यात आले होते. या डेबिटकार्डच्या माध्यमातून २,८४९ व्यवहार करण्यात आले होते. यामध्ये १२ हजार व्यवहार व्हिसी कार्डद्वारे करण्यात आले. त्यामाध्यमातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहाराच्या माध्यमातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून लुटून नेण्यात आले. मुंबई, इंदूर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची फोटो तयार करण्यात आले. त्याचबरोबर मोबाइल लोकेशनवरुन ते भिवंडी, संभाजीनगर, हैदराबाद, गोवा, विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत यांना बेड्या ठोकल्या आहेत.