घरठाणेशहाड रेल्वे स्थानकानजीक मालगाडीचे कपलिंग तुटले, भर पावसात प्रवाशांचा खोळंबा

शहाड रेल्वे स्थानकानजीक मालगाडीचे कपलिंग तुटले, भर पावसात प्रवाशांचा खोळंबा

Subscribe

कल्याण- मुसळधार पाऊस सुरू असताना गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता शहाड- आंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडीचे सांधेजोड (कपलिंग) तुटले. कसाराकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने कसारा, आसनगाव, टिटवाळाकडे जाणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण, ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात खोळंबल्या.

शहाड रेल्वे स्थानकातून गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता एक मालगाडी कसारा दिशेने जात असताना अचानक या गाडीचे दोन डब्यांमधील सांधेजोड (कपलिंग) तुटले. ही घटना घडली त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. सांधेजोड तुटताच दोन्ही बाजुचे डबे एकमेकांपासून विलग झाले. ते रुळावरुन खाली न घसरता रुळावरच थांबले. ही माहिती शहाड रेल्वे स्थानक मास्तरना कळताच त्यांनी तातडीने ही माहिती देखभाल, दुरुस्ती पथकाला दिली.
हे पथक घटनास्थळी येईपर्यंत पावसामुळे रेल्वे मार्गिकेत पाणी साचण्यास सुरुवात झाली होती.

- Advertisement -

या कालावधीत सीएसएमटीकडून टिटवाळा, आसनगाव, कसाराकडे जाणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण, ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात खोळंबल्या. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अगोदरच पावसामुळे लोकल उशिरा धावत होत्या. त्यात मुसळधार पाऊस. मालगाडीचे सांधेजोड तुटल्याने लोकल जागोजागी खोळंबल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला.

दुरुस्तीचे काम पथकाने संध्याकाळी सात वाजता पूर्ण केले. त्यानंतर या मार्गिकेवरुन मालगाडी कसारा दिशेने रवाना करण्यात आली. त्या पाठोपाठ कसाराकडे जाणाऱ्या लोकल, लांबपल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या. पाऊण तास दुरुस्ती कामासाठी लोकल खोळंबल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून या घटनेनंतर लोकल १५ ते २०मिनिटे उशिराने धावत होत्या.

- Advertisement -

शहाड रेल्वे स्थानका जवळ मालगाडीचे सांधेजोड तुटल्याने काही वेळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली होती. पाऊण तासात बिघाड दुरुस्त करुन या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे, अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी दिली.


हेही वाचा : मुंबईतील संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम, प्रवाशांचा खोळंबा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -