एकनाथ खडसेंना धक्का; पत्नी मंदाकिनी खडसेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला, अजामीनपात्र वॉरंट जारी!

Eknath Khadse and Manadakini Khadse

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी पीएमएलए विशेष कोर्टाने एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसंच, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. तर एकनाथ खडसे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव तुर्तास दिलासा देत कोर्टाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला ठेवली आहे.

पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. या प्रकरणी चौकशीसाठी मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स बजावले होते. तसंच, एकनाथ खडसे यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. दरम्यान, या दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे. यासाठी मंदाकिनी खडसे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, पीएमएलए विशेष कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसंच, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.

एकनाथ खडसेंवरील सुनावणी २१ ऑक्टोबरला

एकनाथ खडसे यांच्यावर देखील भोसरी भूखंड प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मात्र, खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांच्यावरील सुनावणी पुडे ढकलण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून सध्या ते मुंबई रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ते आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. खडसे यांना अजून काही दिवस रुग्णालयात राहावं लागणार असल्याचं सांगत त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी विनंती केली. त्यावर खडसे यांची ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे असून या प्रकरणात पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.