बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष बांधणीसाठी पवारांकडून नव्याने सुरुवात करण्यात आली असून त्यांनी आता जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात झालेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली सभा ही नाशिक जिल्ह्यातील येवल्यात म्हणजेच छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात झाली. त्यानंतर आज (ता. 17 ऑगस्ट) पवारांची स्वाभिमान सभा ही बीड जिल्ह्यात पार पडत आहे.
हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने रोहित पवारांनी साधला शिंदे गटातील आमदारांवर निशाणा
बीड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असला तरी या ठिकाणी शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचेच लक्ष आहे. शरद पवार यांची सभा पार पडण्यापूर्वी बीडमध्ये पवारांची मोठी रॅली पार पडली. त्यानंतर या सभेला सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीला शरद पवार यांच्या गटातील तरुण आमदार संदीप क्षीरसागर यांनी भाषण केले. पण यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. (Criticism of MLA Sandeep Kshirsagar without naming Dhananjay Munde in Beed meeting)
बीडमधील सभेमध्ये बोलताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा जितका माझा सत्कार झाला नाही, त्यापेक्षा अधिक सत्कार हा माझी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर झाला. मतदारसंघात ज्यावेळी पुन्हा बैठकी घेण्यासाठी निघालो तेव्हा मी एकटाच आमदार होतो. पण त्यावेळी जिल्ह्यातील अनेकांनी मला पाठिंबा दिला.
जिल्ह्यात फिरत असताना तालुक्यानुसार बैठका घेतल्या. पण त्या बैठकांचे रुपांतर हे सभेत झाले. मला तेव्हा वाटले की हे नेमके काय सुरू आहे. मी एका दिवसात इतका लोकप्रिय कसा झालो, असा प्रश्न पडला. पण जिल्ह्यातल्या काही लोकांना अजूनही काही कळालेले नाही. त्यांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे आता ते जेव्हा लोकांमध्ये जातील तेव्हा त्यांना त्यांची जागा दिसून येईल आणि ही जागा लोकच दाखवणार, असे संदीप क्षीरसागर यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काही लोक काय भाषण करत होती. आम्ही मोठ्या व्यासपीठावर भाषण केले नाही. फक्त भाषण पाहिली असे म्हणत क्षीरसागर यांनी मुंडेंची नक्कल केली. मी कोणाचे नाव घेतले नाही असे सांगत क्षीरसागर म्हणाले की, त्यांनी एक भाषण भारी केले होते. यामध्ये ते म्हणाले होते की, कोणाचा पण नाद करयचा पण साहेबांचा नाद करायचा नाही. पण ते जे बोलले हे त्यांनाच समजले नाही, असा टोला संदीर क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.