Homeमहाराष्ट्रManoj Jarange : लक्षात ठेवा, मराठेच साथ देणार, जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य करत...

Manoj Jarange : लक्षात ठेवा, मराठेच साथ देणार, जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य करत ओबीसींना केले आवाहन

Subscribe

मराठा आरक्षणाचा लढा संपला नसल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिली आहे. आज (ता. 04 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी ओबीसी समाजाला आवाहन करत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

जालना : मराठा आरक्षणाच्या पुढील टप्प्यातील लढ्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. सध्या ते त्यांच्या आंतरवाली सराटी या गावातील घरी मुक्कामाला आहेत. अद्यापही मराठा आरक्षणाचा लढा संपला नसल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिली आहे. आज (ता. 04 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी ओबीसी समाजाला आवाहन करत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. तर भुजबळांनी काल शनिवारी (ता. 03 फेब्रुवारी) आक्रमकपणे केलेल्या वक्तव्यांनाही जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Criticizing Chhagan Bhujbal, Manoj Jarange appealed to the OBC community)

हेही वाचा… Maratha Reservation : मुंबईत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण पूर्ण

प्रसार माध्यमांसमोर मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अरेतुरेची भाषा वापरली आहे. भुजबळांकडे आम्ही लक्ष देत आहे. त्यांचा स्वत:च्या सरकारवर संशय आहे. ते भंगार विचाराचा माणूस आहे. ते ज्या पक्षात जातात, तो पक्षही संपवतात. त्यांनी स्वत:च्या कुटुंबास अडचणीत आणले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या सरकारवर ते शंका घेत आहेत. ज्या पक्षाने भुजबळ यांना आता मोठे केले, तोही पक्ष त्यांनी मोडला. त्यांच्या मनात आले तर ते सरकारही मोडून काढतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते डॅमेज करू पाहात आहे, असा आरोपही जरांगेंनी यावेळी केला.

तर, भुजबळ यांचे विचार खालच्या दर्जाचे आहेत. गोरगरीब जनता उपाशी राहावी, ही त्यांची इच्छा दिसते. मग ते ओबीसी असो किंवा मराठा समाजाचे असो. त्यांच्या विचारांना आम्ही सुधारू शकत नाहीत. जे गरीब नाभिक आपला व्यवसाय करतात, त्यांनाही आता व्यवसाय करू द्यायचा नाही, असे भुजबळांचे स्वप्न दिसते. ते बारा बलुतेदारांना ओबीसी आरक्षण मिळू देत नाही. आता त्यांना व्यवसाय करु देत नाही. माझी गोरगरीब ओबोसी बांधवांना विनंती आहे. तुम्हाला मराठा समाजच साथ देणार आहे. इथून पुढे तरी तुम्ही शहाणे व्हा. भुजबळांना विनाकारण बळ देऊन तुमच्या घरात साप ठेऊ नका, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकारणात भुजबळ जरांगेंना नेमके काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.