एकीकडे राज्यात थंडीचे दिवस सुरु आहेत. तर दुसरीकडे पाहता राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तसेच मुंबई, कोकण वगळता राज्यातील इतर भागात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर बुधवारी परभणी शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यातच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने पाऊस पडणार असल्याची शक्यताही वर्तवली होती. त्याप्रमाणे परभणीत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे शेतीतील ज्वारी, गहू, हरबरा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील दोन दिवस पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर १९ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२० फेब्रुवारीपासून हवामान स्थिर होईल
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही ठिकाणी बुधवारी तुरळक पाऊस पडला. तसेच आज देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, येत्या २० फेब्रुवारीपासून हवामान स्थिर होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – Live Update : मुंबईकरांची होतेय ‘लोकल’ भूल