मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या विरोधकांच्या आघाडीची म्हणजेच ‘INDIA’ ची बैठक आज (ता. 31 ऑगस्ट) आणि उद्या (ता. 01 ऑगस्ट) मुंबईत पार पडत आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून देखील ‘महामंथन’ या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून या बैठकीची महाविकास आघाडीकडून तयारी करण्यात येत होती. आजच्या या बैठकीमध्ये संध्याकाळी 6.30 वाजता INDIA आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. तर, 8 वाजता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. या डिनरमध्ये खास महाराष्ट्रीयन पद्धतीचे मेन्यू ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु, या बैठकीवर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा दावा उदय सामंत यांच्याकडून करण्यात आला आहे. (Crores of rupees wasted on few hours of ‘INDIA’ alliance meeting, Uday Samant criticizes)
हेही वाचा – महायुतीकडून INDIA आघाडीच्या नेत्यांचे स्वागत पण…; दीपक केसरकरांनी स्पष्ट केली भूमिका
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज (ता. 31 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीच्या बैठकीवरील खर्चाचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी बैठकीवर सडकून टीका करत म्हटले की, I.N.D.I.A. ही असंतुष्ट लोकांची संघटना आहे. त्यामुळे या संघटनेचे दुकान 2024 नंतर पूर्ण बंद होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उदय सामंत यांनी बैठकीवर करण्यात आलेला खर्च मांडत सांगितले की, या बैठकीमध्ये काही जुन्या खुर्च्या वापरण्यात येणार होत्या. परंतु, आता या बैठकीमसाठी नवीन खुर्च्या आणण्यात आलेल्या आहेत. 65 खुर्च्यांसाठी 45 हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. ही बैठक दोन दिवसांची आहे असे सांगण्यात आले आहे, पण प्रत्यक्षात ही बैठक केवळ 14 ते 15 तासांची आहे. ज्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. ग्रँड हयातमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे. तर जे महाराष्ट्रीयन थाळी ठेवण्यात आली आहे, त्याची किंमत साडे चार हजार आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आमच्या हॉटेलचा खर्च किती असा प्रश्न करत आकांडतांडव करणाऱ्यांनी यांकडे लक्ष द्यावे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.
यावेळी उदय सामंत यांच्याकडू 26 पक्षांची यादी दाखविण्यात आली. या यादीमध्ये इंडिया आघाडीत समाविष्ट असलेले दोन महाराष्ट्रातील पक्ष हे 25 व्या आणि 26 व्या स्थानावर असल्याचे सामंत यांनी म्हटले. जी यादी हॉटेलकडे गेली आहे त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष 26 व्या स्थानावर आहे. तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 व्या स्थानी आहे.” त्यामुळे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष हे शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असल्याची टीका सामंतांनी केली.