Homeमहाराष्ट्रकार्यादेश नसताना मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण, कोट्यवधीची उधळपट्टी

कार्यादेश नसताना मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण, कोट्यवधीची उधळपट्टी

Subscribe

निधी उपलब्धतेच्या अभावी आर्थिक कोंडीत सापडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई इलाखा शहर विभागाने निविदा प्रक्रिया, कार्यादेश या प्रक्रियेला फाटा देत मंत्रालयातील मंत्री दालनांच्या  नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.

मुंबई (प्रेमानंद बच्छाव) : निधी उपलब्धतेच्या अभावी आर्थिक कोंडीत सापडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई इलाखा शहर विभागाने निविदा प्रक्रिया, कार्यादेश या प्रक्रियेला फाटा देत मंत्रालयातील मंत्री दालनांच्या  नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निविदा न मागवता सुरू केलेल्या या कामाला कार्योत्तर मंजूर करून घेण्याचा घाट बांधकाम विभागाने घातला असून मंत्रालयातील दालनांप्रमाणे मंत्र्यांचे बंगलेही सजवले जात आहेत. (Crores of rupees wasted on renovating ministers offices without a work order)

मुंबई इलाखा शहर विभागाने एकाचवेळी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयासह 10 ते 12 मंत्री दालनांचे काम हाती घेतले आहे. याशिवाय मंत्रालय विस्तारित इमारतीत कृषी खात्याच्या कार्यालयाचा कायापालट करण्यात येत आहे. मंत्रालय मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर विशेष दालनाचे काम सुरू आहे. सातव्या मजल्यावर दोन राज्यमंत्र्यांना दालने देण्यात आली आहेत. या दालनांची कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे मंत्रालयाला अक्षरशः फर्निचर कारखान्याचे स्वरूप आले आहे.

पाच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सचिवांचे दालन देण्यात आले होते. या दालनाच्या सजावटीवर तेव्हा काही कोटी रुपयांचा खर्च झाला होता. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दालनाचे वाटप झाले असून बांधकाम विभागाने पुन्हा नव्याने या दालनाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. या दालनात नवीन वातानुकुलित यंत्रणा तसेच किमती फर्निचर बसवले जाणार आहे.

हेही वाचा – शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल, 23 जानेवारीला मेळाव्याचे आयोजन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आदी मंत्र्यांची दालने चकचकीत केली जात आहेत. याशिवाय मंत्री कार्यालयाला नवीन फर्निचर, खुर्च्या पुरवल्या जाणार आहेत. मंत्री दालनांचे नूतनीकरण आणि इतर साहित्य पुरवठा यावर 12 ते 15 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आर्थिक अनागोंदीमुळे कायम चर्चेत असलेल्या मुंबई शहर इलखा विभागाला गेले वर्षभर राज्य सरकारकडून पुरेसा निधी देण्यात आला नाही. सरकारकडून निधी वितरीत न झाल्याने दक्षिण मुंबईतील शासकीय इमारती, अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थाने येथे रंगरंगोटी, देखभाल दुरुस्तीची कामे केलेल्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची  देयके थकीत आहेत. ही देयके न मिळाल्याने कंत्राटदारांनी गेल्या वर्षी कामबंद आंदोलन केले. अनुभवी कंत्राटदारांनी शासकीय कार्यालयांची नवी कामे हाती घेण्यास नकार दिल्याने इलाखा शहर विभागाला नव्या आणि कामाचा फारसा अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना हाताशी धरून नूतनीकरणाचे काम हाती घ्यावे लागले आहे.

हेही वाचा – शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल, 23 जानेवारीला मेळाव्याचे आयोजन

दालनाच्या नूतनीकरणासाठी अद्याप आदेश नाही

दरम्यान, बांधकाम विभाग इलाखा शहर कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर यांनी सांगितले की, मंत्रालयातील मंत्री दालनाच्या नूतनीकरणासाठी संबंधित कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. मात्र शासनाकडून विभागाला निधी मिळत नसल्याने मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याची कामे हाती घेणे विभागाला जिकरीचे बनले आहे, अशी माहिती विद्याधर पाटसकर यांनी दिली.


Edited By Rohit Patil