घरताज्या घडामोडीनववर्षानिमित्त राणी बागेत पर्यटकांची गर्दी, पालिकेला १४ लाखांची कमाई

नववर्षानिमित्त राणी बागेत पर्यटकांची गर्दी, पालिकेला १४ लाखांची कमाई

Subscribe

भायखळा येथील राणी बागेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२३ रोजी तब्बल ३२ हजार ८२० हजार पर्यटकांनी विक्रमी भेट दिल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत तब्बल १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांची कमाई जमा झाली. यापूर्वी, ६ नोव्हेंबर २०२२ रोजी ३२ हजार पर्यटकांनी भेट दिल्याची विक्रमी नोंद झाली होती. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत ११ लाख १२ हजार ९२५ रुपयांची कमाई जमा झाली होती.

वास्तविक, आज सकाळपासूनच राणीच्या बागेत पर्यटकांची एवढी गर्दी लोटली होती की, आणखीन मोठ्या संख्येची विक्रमी नोंद होऊ शकली असती. मात्र राणीच्या बागेची जागा, व्यवस्थान, तिकीट कक्ष आदी परिस्थिती पाहता सर्वांना सामावून घेणे शक्य नव्हते. त्यामुळे राणी बाग प्रशासनाने अखेर सायंकाळी ४.४५ वाजता मुख्य प्रवेशद्वार बंद केले व गर्दीला आवर घातला. त्यामुळे हिरमोड झालेल्या शेकडो पर्यटकांना नाईलाजाने माघारी जावे लागले, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे. त्यामुळे पालिकेला आणखीन काही लाखांच्या कमाईवर पाणी सोडावे लागले.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने राणीच्या बागेचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनी देखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे राणीची बाग फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे. कोरोना कालावधीत संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेली राणीची बाग कोरोना निर्बंध संपल्यानंतर पर्यटकांसाठी आकर्षणाचे मोठे ठिकाण ठरले आहे.

अभ्यागतांची वाढती संख्या आणि त्यासोबत महसुली उत्पन्नात होत असलेली भर यातून ते सातत्याने सिद्ध होत आहे. विशेषतः आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीत या राणीच्या बागेत येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारची संधी साधून पर्यटकांनी मोठ्या संख्येने या राणीच्या बागेला भेट दिली.

- Advertisement -

नाताळप्रसंगीही राणीच्या बागेत झाली होती गर्दी

अशाच प्रकारे नाताळच्या आदल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर रोजी राणीच्या बागेत २२,०६६ पर्यटकांनी भेट दिली व त्यातून पालिकेला ८ लाख ५ हजार १९० रुपयांची कमाई झाली. तर, २५ डिसेंबर रोजी म्हणजे नाताळच्या दिवशी एका दिवसात तब्बल ३१ हजार ४१२ पर्यटकांनी राणी बागेत भेट दिली व त्यातून पालिकेला तब्बल १९ लाख २९ हजार २९० रुपयांची कमाई झाली. त्याचप्रमाणे, नाताळच्या दुसऱ्या दिवशीही १९ हजार ३२८ पर्यटकांनी राणी बागेत भेट दिली व त्यातून पालिकेला ७ लाख ७ हजार ५० रुपयांची कमाई झाली होती.

आज नववर्षाच्या पाहिल्याच दिवसात तब्बल ३२ हजार ८२० पर्यटकांनी या राणीच्या बागेत भेट दिली. त्यातून पालिकेला १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांची कमाई झाली. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने २७ हजार २६२ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ९ लाख ६० हजार ७२५ रुपयांची कमाई झाली. तर ऑनलाईन नोंदणी करून ५ हजार ५५८ जणांनी भेट दिली. यातून ४ लाख १८ हजार रुपयांची तिजोरीत भर पडली.

विशेष म्हणजे, राणीच्या बागेत विक्रमी संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध करून दिली होती. तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमून गर्दीचे योग्य रीतीने नियंत्रण करण्यात आले. तसेच पर्यटकांचे व्यवस्थापन करताना काळजी म्हणून दोनदा मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद करून नियोजन करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून देखील अतिशय योग्य रितीने सर्वांना पक्षी, प्राणी आणि उद्यान पाहता येईल, याची प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली.


हेही वाचा : माझ्याविरोधात कट करणाऱ्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -