पुण्यात वारजे पुलाजवळ परप्रांतीयांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा विसर!

देशभरातील दुसरा लॉकडाऊन संपला असून तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. आज पुण्यात घरी जाण्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ परप्रांतीय मजुरांनी गर्दी केली होती. यावेळी अचानक जमलेल्या गर्दीमुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. अखेर काही वेळा नंतर परप्रांतीय नागरिकांना एका शेडमध्ये घेऊन जात त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. केंद्र सरकारने सर्व मजुरांना आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने आता सर्वजण घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  नाव नोंदणीसाठी, आरोग्य सर्टीफेकीट घेण्यासाठी मजूर रांगा लावत आहेत.

ज्यांना आपल्या गावी जायचे आहे अशा नागरिकांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांना देण्यात आले होते. त्यामुळे नावनोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ उत्तरप्रदेशच्या नागरिकांनी गर्दी केली होती. पण गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला पांगवले. त्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला.

गेले काही दिवस परप्रांतीयांना घरी पाठवा अशी मागणी सातत्याने होत होती. अखेर राज्य सरकारने आता पुढाकार घेतला आहे.  तसेच खासगी वाहन अथवा टॅक्सीने प्रवास करण्यासही मुभा देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्य सरकार, रेल्वे प्रशासन आणि महापालिका आयुक्तांची बैठक झाली. जे मजूर जाणार त्यांना महापालिका स्थानिक शाळेत कॅम्प लावणार आहे. त्या ठिकाणी अशा मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मजूरांसाठी अटी

१. एका ट्रेनमध्ये केवळ १२०० प्रवासी प्रवास करू शकतात

२. प्रवास करणाऱ्यांना मास्क, पाणी आणि जेवण देण्यात येईल.

३. खासगी गाडी, टॅक्सीमधून जाण्यास मजुरांना मुभा

  1. जवळच्या रेल्वे स्थानकावरून ट्रेन सोडणार

हे ही वाचा – रामायणातील रावणाच्या निधनाच्या अफवांना पुर्णविराम, स्वत: ट्वीट करत केला खुलासा!