शिंदे गटातील 15 बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची टीम तैनात

आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आल्यामुळे बंडखोरीमागे भाजपचा हात असल्याचा संशय अधिक बळावला आहे. आमदारांना केंद्राने सुरक्षा पुरवल्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांवर अविश्वास दाखवण्यात आला आहे.

CRPF team deployed outside at house of 15 rebel MLAs from Shinde group
शिंदे गटातील 15 बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची टीम तैनात

एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून शिंदे गटातील आमदारांची कार्यालये फोडण्यात आली आहेत. तसेच आमदारांच्या घराबाहेर सुद्धा निदर्शने करण्यात येत आहे. यामुळे आमदारांनी सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय गृह सचिवांकडे पत्रव्यवहार केला होता. यानंतर केंद्राकडून आमदारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची टीम आमदारांच्या घराबाहेर पाठवण्यात आल्या आहेत.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक नेते आहेत. या नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसैनिक आता रस्त्यावर उतरले असून आमदारांविरोधात घोषणाबाजी सुरु करण्यात आली आहे. यामुळे आमदारांची चिंतासुद्धा वाढली असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर केंद्राकडून सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवान घराबाहेर तैनात करण्यात आले आहेत.

यामध्ये एकूण १५ आमदारांच्या घराबाहेर सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे समजते आहे. या आमदारांच्या घराबाहेर राज्यातील पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. दरम्यान घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था हटवली असल्याचा दावा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीसुद्धा केला होता. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांची सुरक्षा काढून घेतली नाही असे सांगितले आहे. तसेच आमदारांना सुरक्षा पुरवण्यात येते त्यांच्या कुटुंबियांना नाही असेही सांगण्यात आले होते. यानंतर आमदारांच्या घराबाहेर आता केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

घराबाहेर बॅरिकेट्स

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आल्यामुळे बंडखोरीमागे भाजपचा हात असल्याचा संशय अधिक बळावला आहे. आमदारांना केंद्राने सुरक्षा पुरवल्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांवर अविश्वास दाखवण्यात आला आहे.

यापूर्वी केंद्राकडून काही जणांना सुरक्षा

महाराष्ट्रातील अनेक लोकांना यापूर्वी सुरक्षा देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात अभिनेत्री कंगना रणौतने आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या घरावर कारवाई केली होती. कंगना आणि महाविकास आघाडी सरकारमधील वाद वाढल्यानंतर केंद्राकडून कंगनाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यासुद्धा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली आहे.


हेही वाचा : राज्यपालांना रुग्णालयातून डिस्चार्ज, महाविकास आघाडी सरकारबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता