बेळगाव : बेळगाव शहरातील विधानसौध या ठिकाणी सोमवारपासून (9 डिसेंबर) कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. मात्र उद्याच महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी भाषकांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दोन्ही गोष्टी एकाच दिवशी होणार असल्याने कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. बेळगावात ज्या पाच ठिकाणी महामेळवा पार पडण्याची शक्यता आहे, तिथे जमावबंदीचे आदेश लगू करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याशिवाय जमावबंदीचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील कर्नाटक पोलिसांकडून देण्यात आला आहे. (Curfew imposed at five places in Belgaum in the wake of maharashtra ekikaran samiti)
महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या धर्मवीर संभाजी चौक येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता महामेळावा घेणार आहे. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाली उद्याच सुरुवात आहे. याचपार्शभूमीवर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत उद्या महामेळावा घेणारच असा निर्धार केला आहे.
हेही वाचा – Anup Agarwal : खान्देशातील भाजपा आमदाराने घेतली अहिराणीतून शपथ
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यामुळे पुन्हा एकदा बेळगावात सीमावाद तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील धर्मवीर संभाजी चौक, छत्रपती संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, लेले ग्राउंड, व्हॅक्सिन डेपो अशा पाच ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच या सर्व ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासही बंदी घातली आहे. याशिवाय महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांनाही बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते काय म्हणाले?
दरम्यान, कर्नाटक पोलिसांच्या कारवाईवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर.एम.चौगुले यांनी भाष्य केले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि महाराष्ट्रात गेल्यावरच आमचे आंदोलन बंद होणार आहे. यापूर्वी देखील अनेकदा पोलिसांनी दबाव तंत्र वापरून आंदोलनाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांच्या कारवाईला मराठी माणसाने दाद दिली नाही. तसेच यापुढेही देणार नाही. उद्या कोणत्याही परिस्थितीत आम्ही महामेळावा करणारच, असा इशारा चौगुल यांनी दिला.
हेही वाचा – Counterfeit Drug Supply : बीडमधील घटनेत मंत्र्यांचा देखील हात; ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी