मुंबई : सध्या आपल्या देशात फसवाफसवीचे जोरदार बुद्धिबळ सुरू आहे. भाजपाच्या ’वॉशिंग मशीन’वर बोलायचे तरी किती, असा प्रश्न आता पडला आहे. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तशा केंद्रीय तपास यंत्रणा अधिक आक्रमक व हिंसक बनताना दिसत आहेत. देश चालविणाऱ्या सर्व यंत्रणांवर आज एका गटाचा ताबा आहे. सर्वोच्च न्यायालय दबावाखाली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देश वाचविण्याची झुंज एकाकी आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – भाजपाने नुसता खिसा साफ केला तरी…, संजय राऊत यांचा हल्लाबोल
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने समन्स पाठवले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीयांवर तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खासदार भाचे अभिषेक बानर्जी यांच्या जवळच्या लोकांवर नव्याने छापे पडले, तरी यापैकी कोणीही भाजपाला शरण जायला तयार नाही. अशा शरणागतीचे प्रकार फक्त महाराष्ट्रात झाले. दिल्लीपुढे न झुकणाऱ्या महाराष्ट्राला हे लांच्छन काही लोकांनी लावले. या मराठी नेत्यांच्या मदतीने आता महाराष्ट्र लुटला जात आहे, अशी जोरदार टीका खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरातून केली आहे.
अजित पवारांसारखे लोक एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले
भाजपा वॉशिंग मशीनमधून भ्रष्टाचाराचे डाग स्वच्छ करून मिळतात तसे हिंदुत्वाच्या बाबतीतही घडत आहे. अजित पवारांसारखे लोक एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले. शिंदेंचे चाळीस व पवारांबरोबरचे आमदार-खासदार हे उद्या संघ शाखांवर जाऊन कसरती करताना दिसतील व वैचारिक परिवर्तन घडत आहे असे जाहीर करतील, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशात खाण माफियांचा हैदोस
ईडी, इन्कम टॅक्सचे लोक सत्तेचा कसा गैरवापर करीत आहेत ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. छत्तीसगडमधून बघेल यांनी भारतीय जनता पक्ष हद्दपार केला. आता भाजपाच्या जागी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने ‘ईडी’ आणि ‘इन्कम टॅक्स’वाल्यांना उतरवले आहे, असे बघेल म्हणतात. उत्तर प्रदेशात खाण माफियांनी हैदोस घातला आहे. बेकायदेशीरपणे सर्व चालले आहे, पण झारखंडमधील ‘खाण’ व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ईडी तेथे घुसली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – “नितीन देसाईंना उद्धव ठाकरेंनी दरवाजातून हकलविले”, प्रवीण दरेकाराचा आरोप
केंद्रीय तपास यंत्रणांचे बेकायदेशीर कृत्य
‘ईडी’चे संचालक संजय मिश्रा हे कर्तव्यकठोर खरेच असतील तर त्यांनी भाजपा वाशिंग मशीनमधून आलेल्या सर्व ‘ईडी’वीरांच्या कारवाईस चालना द्यायला हवी. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा, महाराष्ट्रात अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळीपासून असे अनेक आहेत, ज्यांच्यावरील कारवाया ‘ईडी’ने भाजपाच्या प्रवेशानंतर थांबवल्या. केंद्रीय तपास यंत्रणांचे हे बेकायदेशीर कृत्य आहे. एका रात्रीत हे लोक ‘हिंदुत्ववादी’ आणि मोदीभक्त झाले व त्यांच्यावरील कारवाया थांबवल्या, असे त्यांनी या सदरात नमूद केले आहे.