घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनॉयलॉन मांजाने कापला गळा; बंदी असूनही सर्रास विक्री

नॉयलॉन मांजाने कापला गळा; बंदी असूनही सर्रास विक्री

Subscribe

सातपूर : धोकादायक नॉयलॉन मांज्याने सातपूरच्या महादेव नगरातील एक दुचाकीस्वार गळा चिरून जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बंदी असलेल्या घातक मांजाची विक्री व वापर खुलेआम सुरू असल्याचे पुढे आले आहे.

महादेव नगर येथे राहणारे प्रवीण महादू वाघ कामानिमित्त अ‍ॅक्टिवा गाडीने सातपूर खोका मार्केटला परिसरात गेले होते. गाडीवर असतानाच अचानक त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजाचा विळखा पडला, त्यांनी गाडी थांबवेपर्यंत मांजा घासून गळ्याला गंभीर जखम झाली होती. ही बाब बाजूच्या नागरिकांना लक्षात येताच त्यांनी धाव घेत वाघ यांना मदत केली. रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखम खोल असल्याने आठ टाके पडले आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर आहे. गळा कापल्याचे लक्षात येताच घटनास्थळी पतंग उडविणार्‍या मुलाने नॉयलॉन मांज्याची फिरकी तशीच टाकून पलायन केले. या घटनांमुळे आता पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची मागणी होते आहे.

- Advertisement -
यंत्रणांची डोळेझाक

गणेशोत्सवादरम्यान पीओपी आणि संक्रांतीदरम्यान नायलॉन मांजा हे समीकरणच होऊन बसले आहे. पूर्णपणे बंदी असूनही घातक मांजाची निर्मिती, विक्री व वापर होत असेल तर कायद्याचा धाक कमी पडल्याचेच हे चित्र आहे. पोलिसांनी अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

संक्रांतीला दीड महिना असतानाही आतापासूनच छुप्या पद्धतीने व ऑनलाईन नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू झाली आहे. पोलिसांनी विक्रेत्यांसह घातक मांजा वापरणार्‍यांवरही कठोर कारवाई करावी. पतंग उडविणार्‍यांची जागेवर जाऊन चौकशी केल्यास अशा दुर्घटनांना आळा बसेल. पोलिसांनी आतापासूनच विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू करावे, अन्यथा नाहक जीव जातील. : अ‍ॅड. महेंद्र शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -