नाशिक : पॅरिस-ब्रेस्ट- पॅरिस (PBP) ही जागतिक स्तरावरील सायकल क्षेत्रातील प्रतिष्ठीत स्पर्धा भगूर येथील गणेश कुंवर या तरुणाने अवघ्या ७३ तास ४६ मिनिट ३३ सेकंदात पूर्ण केली. त्याने या स्पर्धेत भारतातून १२ वे स्थान पटकावत भगूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या स्पर्धेला सायकलिंगमधील वर्ल्डकप मानले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीतील गणेश कुंवर या अल्ट्रासायकलिस्टने शहराचा डंका सातासमुद्रापार फ्रान्समध्ये पिटला. ऑडॅक्स क्लब पॅरिसियन आयोजित फ्रान्समधील पॅरिस येथे 20 ते 24 ऑगस्टदरम्यान जागतिक पातळीवर पार पडलेल्या पॅरिस-ब्रेस्ट- पॅरिस (PBP)-2023, रॅन्डोनिअर या स्वयंआधारित 1220 किलोमीटर ब्रेव्हेट स्पर्धेत जगभरातून 8000 तर, भारतातून 280 सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात नाशिकच्या आठ सायकलिस्टस्ने या स्पर्धेचे आव्हान स्वीकारले.
1220 किलोमीटरची ही सायकल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 90 तासांचा कालावधी दिला जातो. गणेश कुवर यांच्या उत्तुंग अशा कामगिरीबद्दल विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष एकनाथ शेटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर, नगराध्यक्ष अनिता करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे, माजी शहर प्रमुख अंबादास कस्तुरे, हभप गणेश महाराज करंजकर, वृक्षमित्र तानाजी भोर, भगूर अर्बन सोसायटीचे संचालक मंगेश बुरके,शंकर करंजकर, भाऊसाहेब गायकवाड आदींसह शीतल मित्र मंडळ, विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना सामाजिक संस्था यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आज जंगी स्वागत
आंतरराष्ट्रीय सायकलपटू गणेश कुवर २८ ऑगस्ट रोजी भगूर येथील शिवाजी महाराज चौकात भगूर नगरीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.