नाशिक : सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे एकच वेळी त्र्यंबकेश्वरच्या एका खासगी रिसॉर्टमध्ये उपस्थित असल्याने मोठ्या चर्चेला उधाण आले होते. दादा भुसे यांचा कोणताही शासकीय कार्यक्रम नसताना नाशिकमध्ये असल्याने तसेच कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येऊन थेट त्र्यंबकेश्वरच्या खासगी रिसॉर्टवर थांबलेले असल्याने दोघांमध्ये गुप्त बैठक झाली असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र, दोघांनीही या वृत्ताचा इन्कार केला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे दुपारी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या समाज दिन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर कोणताही शासकीय तामझाम न घेता थेट त्र्यंबकेश्वर येथील एका खासगी रिसॉर्टकडे रवाना झाले. त्याआधीच ठाकरे गटाचे युवा नेते त्र्यंबकेश्वर येथील दोन खासगी रिसॉर्टला भेट देण्यासाठी नाशिक दौऱ्यावर होते. ज्यावेळी दादा भुसे त्यातील एका रिसॉर्टवर पोहचले तेव्हा आदित्य ठाकरे त्याच रिसॉर्टवर उपस्थित होते. दादा भुसे यांच्या शासकीय दौऱ्यात रिसॉर्टवर जाण्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याने तसेच आदित्य ठाकरेही फक्त रिसॉर्टला भेट देण्यासाठी नाशिकला आले असल्याने तसेच एकाच वेळी ही दोन्ही नेते एकाच रिसॉर्टवर असल्याने दोघांची गुप्त भेट झाली की काय? अश्या चर्चाना मोठ्या प्रमाणात उधाण आले. दरम्यान, दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधत नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह रिसॉर्टवर आलो असून कोणाशीही भेट झालेली नसल्याचे सांगितले. तसेच, आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत माला कोणाला लपून भेटण्याची गरज नाही, जे होईल ते उघड – उघड असे म्हणत भेटीचे वृत्त नाकारले आहे.
नातीचा वाढदिवस : दादा भुसे
१२ वाजेपासून ४ वाजेपर्यंत सर्व पत्रकार माझ्या सोबतच होते. त्यानंतर मी माझ्या खासगी गाडीने रिसॉर्टवर गेलो. माझी नात भावण्या हीचा पहिला वाढदिवस आहे. तो वाढदिवस आम्हाला मालेगाव मध्ये चिमुकल्यासह मोठ्या प्रमाणात साजरा करायचा होता. मात्र, मालेगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही नातीचा वाढदिवस नाशिकमध्ये घरगुती साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला याठिकाणी बोलावून घेतले. बाकी कोणालाही भेटण्याचा काही संबंधच नाही. असे वक्तव्य दादा भुसे यांनी केले आहे.
खरंच तिथे होते ? : आदित्य ठाकरे
मी अश्या कोणालाही छुप्या प्रकारे भेटायला जात नाही. तसेच मला इतरांसारख हुडया घालून भेटायची गरज नाही. मला खूप दिवस झाले ग्रेप कौंटी आणि विवेदा या आपल्या स्थानिक मुलांनी उभारलेल्या रिसॉर्टसला भेट द्यायची होती. पर्यटन आणि पर्यावरण यांचा संगमातून या रिसॉर्टसची निर्मिती झालेली असल्याने पर्यावरण मंत्री असल्यापासून मला इथे भेट द्यायची होती. ते खरंच तिथे होते का ? मला माहीत नाही. परंतु छुप्या भेटीची गरज नाही असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.