घरमहाराष्ट्र‘गिरणा अ‍ॅग्रो’मध्ये दोषी असेल तर राजकारण सोडेन-दादा भुसे

‘गिरणा अ‍ॅग्रो’मध्ये दोषी असेल तर राजकारण सोडेन-दादा भुसे

Subscribe

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गिरणा अ‍ॅग्रो कंपनीबाबतच्या आरोपांची चौकशी कोणत्याही यंत्रणेमार्फत करावी. दोषी आढळलो तर राजकारणातून निवृत्त होईन अन्यथा राऊत यांनी खासदार आणि आपल्या संपादकपदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यासंदर्भात केलेल्या ट्विटवरून मंगळवारी विधानसभेत गदारोळ झाला. त्यावर वैयक्तिक स्पष्टीकरण देताना भुसे यांनी राऊत हे भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी करतात शरद पवार यांची, असा उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे सदस्य संतप्त झाले. सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. तरीही भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला. दरम्यान, संबंधित कामकाज तपासून आक्षेपार्ह असेल अथवा शरद पवार यांच्याविषयी एकेरी उल्लेख असेल तर तो काढून टाकला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषित केले.

- Advertisement -

भुसे यांच्या गिरणा अ‍ॅग्रो कंपनीने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकर्‍यांकडून गोळा केले, पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या आरोपांबाबत नियम ४८ अन्वये खुलासा करताना दादा भुसे म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गिरणा अ‍ॅग्रो कंपनीबाबतच्या आरोपांची चौकशी कोणत्याही यंत्रणेमार्फत करावी. दोषी आढळलो तर राजकारणातून निवृत्त होईन अन्यथा राऊत यांनी खासदार आणि सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा द्यावा.

शभूराज देसाई भुसेंच्या मदतीला
या गदारोळातच ३ विधेयके मंजूर करण्यात आली. भुसे यांनी शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी अजित पवार यांनी पुन्हा केली. आपण शरद पवार यांच्याबद्दल काहीही अनुचित बोललो नाही, त्यांच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे अध्यक्षांनी तपासून घ्यावे, असा पवित्रा दादा भुसे यांनी घेतला. दरम्यान, ‘शरद पवार यांच्याबाबत आम्हाला आदर आहे. ते कृषीमंत्री असताना राज्यात साखर उद्योगात चांगले काम केले आहे, पण संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले असून गटारातले पाणी, प्रेते अशी आमची रोज संभावना करतात. आम्ही हे सहन करणार नाही, असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -