दादा म्हणजे कमाल आहे…, अजित पवारांचा व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांची राणेंवर टीका

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यात कायम कलगितुरा रंगतो. अगदी एकमेकांवर खटला दाखल करण्याचे दावे दोघांकडून केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत नारायणे राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या महिन्यात ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखावरून संजय राऊत यांच्यावर टीका करताना आपण त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना, हिंमत असेल तर पोलीस संरक्षण सोडून समोरासमोर येण्याचे आव्हान संजय राऊत यांनी दिले होते. त्यावर माझ्या वाटेला येऊ नका. माझी सुरक्षा सोडून मी तुम्ही सांगाल तेथे यायला तयार आहे, असे प्रतिआव्हानच राणे यांनी राऊत यांना दिले होते.

त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांना खासदार बनवले आणि त्यासाठी मी पैसा खर्च केला, असा दावा केला होता. तथापि, खासदार राऊत यांनी नारायण राणे यांचा हा दावा फेटाळत मला खासदार शिवसेनाप्रमुखांनी केले असे सांगितले आणि याबद्दल नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठविली.

आता खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ‘नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले की नाही? राणेसाहेब तर दोनदा पडले. एकदा तिथे कोकणात पडले आणि एकदा मुंबईत वांद्रे का कुठे उभे होते, तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं.. हां… बाईनं पाडलं बाईनं…,’ अशी उपहासात्मक टीका अजित पवार यांनी या व्हिडीओत केली आहे. ‘दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश!,’ अशी टिप्पणी संजय राऊत यांनी त्यावर केली आहे.