घरमहाराष्ट्रउरणमध्ये रस्ता बंद करणार्‍या दादाजी लॉजिस्टिकला झटका!

उरणमध्ये रस्ता बंद करणार्‍या दादाजी लॉजिस्टिकला झटका!

Subscribe

अधिकार्‍यांकडून रस्ता मोकळा करण्याचे आदेश

तालुक्यातील कळंबुसरे, मोठी जुई येथील शेतकर्‍यांचा आणि कोप्रोली अदिवासी वाडीमधील रहिवाशांचा परंपरागत वहिवाटीचा रस्ता बंद करून अडवणूक करणार्‍या दादाजी धाकजी लॉजिस्टिक कंपनीला पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी झटका दिला असून रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने सर्व्हे क्रमांक १२२/२ मधील शेती आणि रस्त्यावर दगड, मातीचा भराव टाकून शेतजमीन, जुना वहिवाटीचा रस्ता जून २०१७ मध्ये बुजविण्यास सुरुवात केली. तसेच पर्यायी रस्ता म्हणून नाल्यातून नव्या दोन फुटांच्या रस्त्याची निर्मिती केली. त्यामुळे या परिसरातील शेतीवर, डोंगर परिसरात ये-जा करणार्‍या शेतकर्‍यांना, आदिवासींना, शिवाय गुरांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने शेतकर्‍यांसह आदिवासींनी ग्रामपंचायत, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. तसेच जुना वहिवाटीचा रस्ता पूर्ववत करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडील मामलेदार कोर्ट कायदा १९०६ चे कलम ५(२) अन्वये दावा दाखल केला.

- Advertisement -

तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांनी शेतकर्‍यांची हरकत फेटाळली होती. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कंळबुसरे गावातील शेतकरी रत्नाकर राऊत, संतोष राऊत, बाळकृष्ण पाटील, मनोहर कातकरी, बाबूराव कातकरी यांच्यासह इतर शेतकरी, आदिवासी बांधवांनी आपल्याला न्याय मिळण्यासाठी उप विभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी याच्या न्यायालयात पुनर्विलोकन अपिल दाखल केले होते. माजी न्यायाधीश डॉ. चंद्रहास पाटील, निवृत्त तहसीदार डी. बी. पाटील, डॉ. प्रदीप म्हात्रे, डॉ. योगेश म्हात्रे यांनी शेतकर्‍यांची बाजू मांडली. वस्तुस्थितीजन्य पुरावे आणि गुगल मॅपवरून जुनी वहिवाट असल्याचे सिद्ध झाल्यामुळे नवले यांनी हा रस्ता शेतकर्‍यांच्या वहिवाटीसाठी मोकळा करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे हक्काचा परंपरागत वहिवाटीचा रस्ता मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -