मुंबई : मुंबई, ठाणे आणि त्यासोबतच आसपासच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई आणि ठाण्यातील अनेक शहरांमध्ये मोठमोठ्यांचे हंडींचे आयोजन करण्यात आले होते. आगामी निवडणुका लक्षात ठेवत राजकारण्यांकडून लाखो रुपयांच्या दहीहंड्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या दहीहंड्या फोडण्यासाठी सर्वच गोविंदा पथकांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. आज (ता. 07 सप्टेंबर) दिवसभरात अनेक ठिकाणी गोविंदा पथकांकडून दहीहंड्या फोडण्यात आल्या. अनेक गोविंदा पथकांनी चार तर पाच तर काही ठिकाणी नऊ थरापर्यंतची सलामी देत बक्षिसांची लयलूट केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी अनेक दहीहंडी कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटींनी देखील मोठा सहभाग दर्शविला. तर बऱ्याच ठिकाणी दहीहंडी फोडत असताना किंवा सलामी देत असताना, थर लावत असताना किंवा थर खाली उतरवत असताना अपघाताच्या घटना देखील घडल्याचे समोर आलेले आहे. (Dahihandi excitement in the state with the return of rains)
हेही वाचा – मुंबईत 35 तर, ठाण्यात 13 गोविंदा जखमी; एका महिला गोंविदाचाही समावेश
ज्याप्रमाणे मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक मंडळांकडून दहीहंडी आयोजित करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे राजकीय हंड्यांची देखील रेलचेल मोठ्या प्रमाणावर दिसून आली. आगामी निवडणुका लक्षात घेता भाजप, शिवसेना (शिंदे गट), मनसे, ठाकरे गट यांच्याकडून विशेषतः लाखो रुपयांची बक्षिसे घोषित करत दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये आकर्षणाचा विषय ठरली ती ठाण्यातील प्रताप सरनाईक यांची संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी. या दहीहंडी कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटीजने हजेरी लावलेली होती. त्यासोबतच मुंबई उपनगरातील मागाठाणे येथे प्रकाश सुर्वे यांच्याकडून देखील दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील तिच्याकडून लावणी सादर करण्यात आली. ज्यामुळे तरुणांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
दहीहंडीचे थर लावत असताना यावर्षी 77 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व गोविंदांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यापैकी अनेक गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत जखमी झालेल्या 77 गोविंदांपैकी 18 गोविंदांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर 7 जणांना दाखल करण्यात आले आहे. तसेच 52 जणांवर ओपीडीत उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
घाटकोपर येथे आमदार राम कदम, दादरमध्ये शिवसेना भवनजवळ युवासेनेकडून निष्ठा दहीहंडीचे ही आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील मानाची हंडी आणि दिघे साहेबांची दहीहंडी म्हणून ओळख असलेल्या हंडीचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले होते. तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहत गोविंदांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात उपनगरातील राजा अशी ओळख असलेल्या ‘जय जवान गोविंदा पथकाने’ 10 थर लावण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्याकडून 9 थर आणि जोगेश्वरीतील कोकण नगर या पथकाने 9 थर लावण्याचा पुन्हा एकदा विक्रम केला.
हिंदी सिनेसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीजपासून छोट्या पडद्यावरील कलाकारांनी या उत्सवाचा आनंद लुटत आपल्या शोजसह चित्रपटांचेही प्रमोशन केले. हिंदी कलाकारांमध्ये रकुल प्रीत सिंग, विकी कौशल, अमिषा पटेल, जॅकी भगनानी, भूमी पेडणेकर, पद्मिनी कोल्हापुरे, सुनील शेट्टी यांच्यासह मराठीतील सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, श्रुती मराठे, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, नृत्यांगना गौतमी पाटील, प्राजक्ता गायकवाड, विजय पाटकर, रूपाली भोसले यांनी दहिहंडीला हजेरी लावली. छोट्या पडद्यावरील ‘ढोलकीच्या तालावर’ आणि ‘लिटिल चॅम्प्स’ या टेलिव्हीजन शोजच्या टिमसह ‘दिल दोस्ती दिवानगी’ आणि ‘अंकुश’ या आगामी मराठी चित्रपटांच्या टिमनेही गोविंदांचा उत्साह वाढवला.