गो…गो…गोविंदा! डोंबिवलीत दहीहंडीची जय्यत तयारी, कलाकारही राहणार उपस्थित

गोविंदा पथकांसाठी दहा लाखांचा विमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात सगळीकडे जन्माष्टमी व दहीकाला उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.

MNS's Dombivali Dahihandi canceled for flood victims
दहिहंडी

डोंबिवली – यंदाच्या दहीकाला उत्सवात दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्यावतीने डोंबिवली पश्चिमेत स्वराज्य दहीहंडी महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात पहिली दहीहंडी फोडण्याचा मान ‘संवाद’ कर्णबधिर शाळेच्या मुलांना मिळणार आहे. हंडी फोडताना कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून सुरक्षिततेची सर्व काळजी घेतली जाणार आहे. हंडीच्या थरांवर चढण्यासाठी सेफ्टी बेल्ट देखील लावले जाणार आहेत. सर्व नियमांचे पालन करून हा दहीकाला उत्सव साजरा करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा – शिवसेना भवनासमोर लागणार सेनेची ‘निष्ठा दहीहंडी’

कोरोना काळात सर्वत्र निर्बंध घालण्यात आल्यामुळे गेली दोन वर्षे सर्वच उत्सव बंद पडले होते. यंदा राज्य शासनाने उत्सवांसाठी परवानगी दिली आहे. त्यातच गोविंदा पथकांसाठी दहा लाखांचा विमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात सगळीकडे जन्माष्टमी व दहीकाला उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.

हास्यजत्रा फेम कलाकार राहणार उपस्थित

दिपेश म्हात्रे फाउंडेशनच्यावतीने यंदा प्रथमच डोंबिवली पश्चिमेत सम्राट चौकात भव्यदिव्य अशा स्वराज्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात डोंबिवलीच्या मंडळांसाठी, मुंबईच्या मंडळांसाठी व  महिला पथकांसाठी अशा एकूण तीन दहीहंडी असणार आहे. आतापर्यंत डोंबिवली-कल्याणमधील ३५ गोविंदा पथकांनी नाव नोंदणी केली आहे. तसेच ठाणे, मुंबई व आसपासच्या शहरातून मिळून एकूण १०० पथकं अपेक्षित आहेत. तसेच या उत्सवाला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार गौरव मोरे व शिवाली परब हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या उत्सवासाठी उपस्थित राहणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे, गोविंदा मंडळांमध्ये मोठी चुरस

वाहतुकीत बदल

या उत्सवामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या मदतीने डोंबिवली पश्चिमेत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. सम्राट चौकापर्यंत येणारे रस्ते वाहतुकीसाठी एकदिशा करण्यात आले आहेत. वाहतुक पोलीस यंत्रणेवर कुठेही ताण पडू नये म्हणून वाहतूक पोलिसांच्या मदतीला दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्यावतीने ३० वॉर्डन नेमण्यात येणार आहेत.