Saibaba : दररोज १५ हजार भाविकांना मिळणार साईबाबांचं दर्शन

शिर्डी संस्थानतर्फे ऑनलाईन आणि ऑफलाईन पासेसची सुविधा, ७ ऑक्टोबरपासून मंदिर होणार खुले

shri-saibaba-sansthan

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिकस्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई संस्थानने भाविकांसाठी नियमावली जाहीर केलीय.

साई संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार दररोज १५ हजार भाविकांना दर्शन मिळणार आहे. यात ५ हजार ऑनलाईन, ५ हजार सशुल्क पासद्वारे, तर ५ हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मोफत दर्शनपास मिळणार आहे. या दर्शन पाससाठी ओळखपत्र मात्र बंधनकारक राहील. http://www.sai.org.in या वेबसाईटवर ऑनलाईन पास घेता येईल. दर तासाला ११५० भाविकांना दर्शन मिळेल. साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सांजआरती आणि शेजारतीला ८० भाविकांना सशुल्क प्रवेश दिला जाईल. याशिवाय प्रत्येक आरतीला १० गावकऱ्यांना प्रवेश मिळेल. दर्शनासाठी मास्क बंधनकारक असेल.

६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षाखालील बालक आणि गरोदर मातांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक भाविकात ६ फुटांचं अंतर ठेवावं लागेल. मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास मनाई करण्यात आलीय. दर गुरुवारची पालखी, तिर्थप्रसाद आणि लाडू प्रसाद मात्र बंद राहील. संस्थानच्या निर्णयानुसार भक्तनिवासही सुरू होणार आहे. दर्शनरांगेत सँनिटायझर, हात-पाय धुण्याची व्यवस्था करण्यात आली असून, बाटली बंद पाणी दिलं जाणार आहे. थर्मल स्कॅनिंगमध्ये रुग्ण आढळल्यास त्याला थेट उपचारासाठी नेलं जाईल. दर दोन तासांनी समाधी मंदिर, दर्शन रांग व मंदिर परिसराची स्वच्छता केली जाईल. भाविकांना त्यांच्या चपला-बूट गाडीत किंवा सुविधा असलेल्या ठिकाणी ठेवावे लागतील.