रस्ते, धरण प्रकल्पांंमुळे शहापुरात बेसुमार वृक्षतोड

वन्यजीवांचा अधिवास सापडला धोक्यात

Tree Cutting in malad

दोन दिवसांपूर्वी किन्हवली मार्गावर एका निलगायीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी मुंबई – नाशिक महामार्गावरील आटगाव जवळ पहाटे रस्ता ओलांडताना एका नर बिबट्याचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्यरात्री येथे घडली आहे. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे. शहापूर तालुक्यात एकीकडे रस्ते व धरण प्रकल्पांच्या नावाखाली झालेली बेसुमार वृक्षतोड, डोंगर फोडण्यासाठी केली जाणारी ब्लास्टिंग, छुप्या पध्दतीने वन्यजीवांची होणारी शिकार, जंगलात पेटविले जाणारे वणवे, मानवी वस्तींचे अतिक्रमण, वाहनांचा होणारा कर्णकर्कश आवाज यामुळे वन्यजीवांचा अधिवास आता धोक्यात आला आहे.

समृद्धी महामार्ग, धरण प्रकल्पात डोंगर, टेकड्या भुईसपाट झाल्याने तेथील वनराई नष्ट होत चालली आहे. जंगल नामशेष झाल्याने बिबटे, भेकर, हरीण, ससे, रानडुक्कर, निलगायी, वानरे आदी वन्यजीव आपला जीव वाचविण्याच्या धडपडीत इतरत्र स्थलांतरीत होत आहेत. यातील कित्येक वन्यजीव गाववस्तीत तर काही आपली तहान भागविण्यासाठी पाणवठ्याच्या शोधात तानसा, मध्य वैतरणा या जलाशयांकडे कूच करताना रात्रीच्या वेळेस रस्त्यावर येत आहेत. अशाच प्रकारे महामार्गावर रस्ता ओलांडून जाणार्‍या अडीच वर्षांच्या एका बिबट्यास अपघात होऊन आपला नाहक जीव गमवावा लागल्याच्या दुर्दैवी घटनेने वन्यजीव प्रेमींमध्ये कमालीची चिंता व्यक्त होत आहे. वाढत्या शिकारीमुळे व महामार्गावरील अपघातांच्या घटनांमुळे वन्यजीवांची संख्या कमालीची रोडावत चालल्याचे धक्कादायक वास्तव या बिबट्याच्या अपघाती घटनेमुळे समोर आले आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगावजवळ संघवी गोल्डन सिटीजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने अडीच वर्षांच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. या बिबट्याच्या अपघाती मृत्यूची माहिती महामार्ग पोलिसांकडून मिळताच घटनास्थळी खर्डी वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. महामार्गावर रस्ता ओलांडून जाताना अज्ञात वाहनाने बिबट्यास जोरदार धडक दिली. बिबट्याच्या पाठीमागील उजव्या पायाच्या मांडीला, पोटाला जबर मार लागला. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.