शिंदे गटाकडून गर्दी जमवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आवाजाचा वापर, दसरा मेळाव्याच्या टीझरवरून हल्लाबोल

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात अनेक उलथापालथ होताना दिसत आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात आता दसरा मेळाव्यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटातून पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या मेळाव्याला अधिकाधिक गर्दी जमविण्यासाठी दोन्ही गटातून प्रयत्न केले जात असून ऐकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून गर्दी जमवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आवाजाचा वापर केल्याचा हल्लाबोल शिवसेनेने शिंदे गटावर केला आहे.

शिंदे गटाने आपल्या टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आवाज वापरला आहे. वास्तविक पाहता गर्दी जमवण्यासाठी टीझर शेअर केला जातो. मात्र शिंदे गटाने गर्दी जमवण्यासाठी थेट उद्धव ठाकरेंच्या आवाजाचा वापर केल्यामुळे शिवसेनेकडून टीका केली जात आहे.

शिंदे गटाच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. त्यावर विसर न व्हावा, अशी टॅग लाईन देण्यात आली आहे.

दरम्यान, ठाकरे गटानेही दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची झलक दाखवण्यात आली आहे. एकाही आमदाराने बंडखोरी केली तर त्याला कायद्याची चिंता न करता तिथेच तुडवा, असं बाळासाहेब ठाकरे म्हणालेत.

एकप्रकारे दोन्ही गटातून ऐकमेकांवर टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर घेण्यात येणार आहे. दोन्ही गटातून गर्दी जमावण्याचे प्रयत्न सुरू असून दोन्ही नेते काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : हा बालिशपणा..,मी त्यांच्याशी बोलत नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया