नाशिक : मरण आणि तोरण प्रसंगात अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी, परंपरांमुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. दुःखद प्रसंगात विधवेलेला अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने महिलांचे खच्चीकरण व अपमान होतो. या चुकीच्या रूढी परंपरेमधून समाज मुक्त व्हावा यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड सातत्याने प्रयत्न करते. याची सुरुवात धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथून करण्यात आली.
प्रगतशील शेतकरी वसंतराव राघो भदाणे ( वय ७९ ) यांच्या अंत्यविधीवेळी पुरुष खांदेकरी ऐवजी सून जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, अनिता भदाणे, कन्या जागृती सोनवणे, पुतणी डॉ. रोहिणी शिंदे, कृषि पर्यवेक्षक प्रियंका पाटील, नलिनी पाटील यांच्यासह बहिणी सिंधूबाई पवार, चित्राबाई सोनवणे, आशाबाई शिंदे, निर्मला सूर्यवंशी या महिला खांदेकरी झाल्यानंतर अंत्ययात्रा निघाली.
वसंतराव भदाणे हे बोरकुंड येथील डॉ. राजेश पाटील यांचे बंधू, मराठा सेवा संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, सामाजिक कार्यकर्ते योगेश भदाणे यांचे वडील व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे व अनिता भदाणे यांचे सासरे होते. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्य सुलभा कुवर, जिल्हाध्यक्ष नूतन पाटील यांनी यावेळी विधवा महिलांचे सौभाग्य अर्पण करून बांगड्या फोडून, कुंकू पुसून अपमान केला जात असल्याचे सांगितले. हे बंद करण्याची सुरुवात आपल्या घरापासून करूया असे त्या म्हणाल्या.
भदाणे कुटुंब आणि गावकर्यांनी सर्वानुमते या उपक्रमास प्रतिसाद दिला. कोणतेही कर्मकांड कालबाह्य रूढी परंपरा न करता पत्नी लता भदाणे यांच्या हस्ते पूजन करुन जिजाऊ वंदनेने अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. बोरकुंड येथे रविवारी १ होणार्या कार्यक्रमात मरण आणि तोरण प्रसंगातील चुकीच्या प्रथा या विषयावर व्याख्यान, शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा गौरव आणि वृक्षारोपण होणार आहे.
अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी, परंपरा यामुळे मरण आणि तोरण प्रसंगी समाजाचे प्रचंड नुकसान होते. लग्न वेळेवर न लागणे, दारू पिवून नाचणे, प्री -वेडिंग यामुळे अनुचित घटना घडतात. दुःखद प्रसंगात विधवा महिलेला अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर विटंबना, खच्चीकरण व अपमान होतो. यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या चुकीच्या रूढी परंपरा बंद कराव्यात. महिलांचा सन्मान करावा यासाठी समाजानेही पुढे यावे. : अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ
कोणत्याही कामाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे असते. समाजात बदल घडवायचं असेल तर महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. सासरे वसंतराव भदाणे यांच्या अंत्यविधी प्रसंगी कोणतेही कर्मकांड, चुकीच्या परंपरा न करता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून व विधवा महिलांचा सन्मान करत अंत्ययात्रा झाली. यासाठी भदाणे परिवार व गावकर्यांनी दिलेली साथ निश्चित मोलाची आहे. : माधुरी भदाणे , प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र