शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

dcm ajit pawar appeals Farmers should not take extreme stand
शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

राज्यातील शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ऊस शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचं काय होणार याची भीती वाटत आहे. ऊसाचे गाळप करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऊसाची शेती केली आहे. यामुळे ऊस वाढलाय परंतु गाळप मोठ्या प्रमाणात होत नाही आहे. वेळेत ऊस नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. ऊस जात नसल्यामुळे एका शेतकऱ्याने ऊसाला पेटवून स्वतः त्यात आत्महत्या केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घेऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. तरीदेखील बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची दुःखद घटना घडली, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला. सर्व ऊस गळीताला नेण्याचे काम सरकार करत आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे, कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे कळकळीचे आवाहन अजित पवार यांनी केले.

राज्यामध्ये जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या भागात काही प्रमाणात ऊस आहे. सातारा आणि पुण्याच्या काही भागातही ऊस असून शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचं काय होणार याची भीती वाटत आहे. महाविकास आघाडीने पहिल्यापासून ऊस वेळेत नेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ऊसाचे क्षेत्र प्रचंड वाढले आहे. तसेच गळीत हंगाम देखील लांबला आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत देखील ऊस संपलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात रिकव्हरी लॉस आणि ट्रान्सपोर्ट सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

साखर आयुक्त आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे दोघेही बारकाईने लक्ष देऊन आहेत. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.


हेही वाचा : आम्ही पाठीमागून वार करत नाही, नाना पटोले यांचा राष्ट्रवादीला टोला