मंत्रालयात काल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममधून राज्यातील प्रकल्पांचा आढवा घेतला आहे आणि आता मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या कोल्ड वॉर सुरू आहे, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. मात्र, मंत्रालयातील कोल्ड वॉरबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच स्पष्टीकरण दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी वॉररुममध्ये जाण्याबाबत स्पष्टीकरण दिले. (DCM Ajit Pawar Talk On Mantralay War Room In Pune)
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
“कोल्ड वॉर अशा अनेक बातम्या काल चालवण्यात आल्या. पण कोल्ड वॉर वगैरे असे काही नाही. मागील अडीच वर्षे मी सरकारमध्ये असताना अनेकदा राज्यातील महत्वाकांशी प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी दर 15 दिवसांनी आढावा बैठका घेत होतो. या बैठकीमधून त्या प्रकल्पांना गती देण्याचे काम करत होतो. सध्यस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांच्या आढावा घेण्यासाठी एका कमिटीची नेमणूक केली आहे. मोपलवार यांना या कमिटीची जबाबदारी देण्यात आली असून ही कमिटी सध्या राज्यातील महत्वाकांशी प्रकल्पांचा आढावा घेते”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
“महाराष्ट्राच्या विकासासाठी, लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झाले. याशिवाय, देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठींबा देण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो. हे सगळं असताना मी अर्थमंत्री म्हणून राज्यातील महत्वाकांशी प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो, पण अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. मोपलवारही त्या बैठकीत होते”, असेही अजित पवार यांनी सांगितले.
“राज्यातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. यातून सुटका करण्यासाठी आम्ही आढावा घेतो. अनेक खासगी जागांबाबत असतील किंवा राज्यातील अनेक प्रश्न अशतील ते या बैठकीत सोडवले जातात. विशेष म्हणजे कोणतेही सरकार असो राज्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय नियमांनुसार राज्याचा प्रमुखच घेतो”, असेही अजित पवार म्हणाले.