MPSC विद्यार्थ्यांच्या ‘त्या’ मागणी अखेर उपमुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद; म्हणाले…

dcm devendra fadanvis on pune mpsc students protest against new mpsc exam pattern

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेले बदल 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी साष्टांग दंडवत आंदोलन सुरु केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारला ही मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभरात अधिक तीव्र आंदोलन करु असा इशारा दिला आहे. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार असे नेते सहभागी झाले होते. दरम्यान या आंदोलनाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत विद्यार्थ्यांना फोनवरून मोठा दिलासा दिला आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागणीला अखेर उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र जोपर्यंत  कॅबिनेटमध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत फोन कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. पडळकरांनी फोनवरून विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी फडणवीसांच्या कानावर घातली.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, एमपीएससंदर्भात मागील सरकारच्या काळात दळवी समिती गठित करण्यात आली होती, त्या समितीनेच हा निर्णय घेतला होता. आता सगळ्यांनी ही मागणी केल्याने मी स्वत: कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करत यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलं आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णयाची घोषणा करतील, पण समजा सकारात्मक निर्णय झाला तर आता 2025 म्हणात तसं मग 2027 म्हणाल असं करु नका. आपल्याला यूपीएसीच्या समकक्ष जाणं गरजेचं आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल 2023 पासून लागू होणार असल्याने गेल्या वर्षभरापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे एमपीएसच्या विद्यार्थ्यांनी हे बदल 2023 पासून लागू करण्याऐवजी 2025 पासून लागू करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमपीएससी विद्यार्थी संघटनांकडून अनेकदा आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही सरकारने याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे आज मोठ्या संख्येने पुण्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.


कोयता गँगची शिताफी तर पाहा! बालसुधार गृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून झाले फरार