
देशाच्या संंसदेच्या नव्या वास्तूचं उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परंतु हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे, अशी मागणी करत विरोधकांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. यावरुन आता भाजप आक्रमक झालं असून भाजपनं विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. विरोधकांनी राष्ट्रपती आणि राज्यपालांना डावलतं केलेल्या उद्घटनांची यादी वाचून दाखवत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत. ( DCM Devendra Fadnavis Criticized Oppositions and read the list of inauguration done by their party chief Sonia Indira gandhi and Rajiv gandhi )
संसद भवन हे 140 कोटी लोकांच्या आस्थेचं मंदिर आहे. त्यावर बहिष्कार घालणं म्हणजे लोकशाहीला नाकारणं आहे. विरोधक म्हणतात की, राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं परंतु जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेच्या उपभवनाचं उद्घाटन केलं होतं तसचं, राजीव गांधी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचं उद्घाटन केलं होतं, तेव्हा का नाही टाकला बहिष्कार. तेव्हा राष्ट्रपतींचा अपमान झाला नाही का? असा प्रश्न फडणवीसांनी केला आहे. तसचं त्यांनी यादी वाचून दाखवत विरोधकांना धारेवर धरलं आहे.
- इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं उद्घाटन केलं
- तामिळनाडूमधील विधानसभेचं उद्घाटन सोनिया गांधी यांनी केलं
- नितिश कुमार यांनी बिहारच्या सेंट्रल हॉलचं उद्घाटन केलं
- युपीएचं सरकार असताना, मणिपूरच्या इन्फालमध्ये मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी तिथल्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा राज्यपालांच्या हस्ते का नाही केलं?
- तरुण गोगोई यांनी 2014 साली आसामच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं
- 2014 मध्ये झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी विधानभवनाचं उद्घाटन केलं
- 2018 मध्ये आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधान भवनाचं उद्घाटन केलं
- 2020 मध्ये सोनिया गांधी यांनी छत्तीसगढच्या विधानभवनाचं भूमिपूजन केलं. त्या तर संविधानीक पदावरही नव्हत्या. मग त्यांनी कसं काय उद्घाटन केलं. ही यादी वाचून दाखवत यावेळी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना का डावललं गेलं याचं उत्तर विरोधकांनी द्यावं, असा फडणवीस यावेळी म्हणाले.
विरोधकांकडे ‘ना नेता आहे ना नीती’ आहे. त्यामुळे विरोधकांचं जे नरेंद्र मोदींना हरवण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. देशानं पहिल्यांदा स्वतंत्र भारताची स्वत:ची अशी संसद तयार केली आहे. हे संसद भवनाची आसन क्षमता जास्त आहे. तसचं, आधुनिकतेनं ती परिपूर्ण आहे. तर अशा संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार का? याचाच अर्थ असा की, हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत. सत्तेचे सौदागर आहेत. मोदींचा मुकाबला करु शकत नाहीत, म्हणून हे सगळे एकत्र आले आहेत. पण, माझा यांना सवाल आहे. मी इतकी उदाहरण दिली याचं आधी उत्तर द्या. यावेळी का बहिष्कार टाकला नाही, यांच स्पष्टीकरण द्या. बहिष्कार टाकणारी मंडळी ही लोकशाही विरोधी लोक आहेत, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली आहे.
( हेही वाचा: गद्दारांची गाडी चालवण्याची फडणवीसांवर वेळ, संजय राऊतांची खोचक टीका )