बस अपघातानंतर बचावकार्य सुरू; गिरीश महाजनांना तातडीने इंदूरला पाठवले – देवेंद्र फडणवीस

Devendra fadnavis

मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारकडून दोन लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. तसेच अद्यापही बचावकार्य सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना मध्य प्रदेशात पाठवण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे बचावकार्यावर लक्ष आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ही अतिशय दुखद घटना आहे. अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. एकनाथ शिंदे आणि मी
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रशासन तात्काळ घटनास्थळी पाठवून कारवाई सुरू केली आहे. कोणाला वाचवता येईल का?, यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. गिरीश महाजन यांना तातडीने इंदूरला पाठवण्यात आले आहे. या बचाव मोहिमेसाठी मदत करावी, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

जळगाव जिल्ह्यात बचाव कार्यासाठी एक समन्वय केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रातून नातेवाईकांना सर्व माहिती दिली जात आहे. धार येथील जिल्हाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मला येथील परिस्थिती दाखवली आहे, असं फडणवीस म्हणाले.

राजकीय हस्तक्षेप करून निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता, त्या आरोपांना देखील फडणवीसांनी उत्तर दिले. निवडणुकांबाबत त्यांचं पत्र मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी त्याबद्दल निर्णय घेऊ, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : राष्ट्रपती निवडणूक: शिंदे गटाला मोठा धक्का, एका आमदाराच्या मतदानावर बंदी