सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींवर ठाकरे बोलणार का?, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मला एक गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला विचारायची आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतीदिन आहे. परंतु आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचं काम हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. मागील काळात तुमची मजबुरी होती, तुम्हाला सरकार चालवायचं होतं. त्यामुळे रोज राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचे. तरी तुम्ही गप्प बसत होते. आता तुमची नेमकी मजबुरी काय आहे?, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

आजही तुम्ही ज्यांच्या गळाभेटी घेता ते रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या अधिवेशनात चार आठवड्यांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. तीन ते चार वर्षांनी आता चार आठवड्यांचं अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सामान्य माणसाच्या हिताकरिता चर्चा व्हावी आणि निर्णय घेण्यात यावे. तसेच सरकार यासाठी सज्ज आहेत. लोकहिताचे निर्णय या अधिवेशनात राज्य सरकारकडून घेतले जातील. विधानपरिषदेत आता ३ बिलं ही प्रलंबित आहेत. तसेच ७ अजून प्रस्तावित विधयकं आहेत. यामध्ये जे लोकायुक्ताचं बिल आहे, ते या अधिवेशनात करण्यासंदर्भात आमचा निर्णय असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

८ मार्चला आपण आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल मांडणार आहोत. तर ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. आज चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकतांना नेहमीचीच कारणं दिली आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पावरील त्यांची प्रतिक्रिया देखील तयार झाली असेल. त्यांनी आमचा अर्थसंकल्प वाचावा अशी आमची अपेक्षा आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : आदित्य ठाकरेंपासून प्रज्ञा सातव यांच्यावर राज्यात हल्ले, सरकार गुंडांना पाठीशी घालतयं – अजित