उद्धव ठाकरेंनी जनाची आणि मनाची ठेवली पाहिजे; वीज बिलाच्या मुद्द्यावर फडणवीसांचा टोला

मविआच्या सरकारने त्या काळात इतके कनेक्शन कट केले आणि आत कोणत्या तोंडाने बोलत आहेत. आम्ही जे बोलतो ते करतोच. त्यामुळे जे बोलत आहेत त्यांनी जनाची आणि मनाची ठेवली पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि 'मविआ' सरकारवर निशाणा साधला.

मविआच्या सरकारने त्या काळात इतके कनेक्शन कट केले आणि आत कोणत्या तोंडाने बोलत आहेत. आम्ही जे बोलतो ते करतोच. त्यामुळे जे बोलत आहेत त्यांनी जनाची आणि मनाची ठेवली पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि ‘मविआ’ सरकारवर निशाणा साधला. महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचं आज मंत्रालयात अनावरण करण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंवर टीका केली. (DCM Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray)

“महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचं अनावरण आज करण्यात आले. महाराष्ट्रात आणि देशात खऱ्या अर्थाने समजामध्ये सुधारणा करणे, महिलांच्या शिक्षणाकरीता एकप्रकारे क्रांती आणणे. यासाठी महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी योगदान दिले, ते अतुलनीय आहे. कदाचीत त्यांनी संघर्ष केला नसता तर हे अधिकार महिलांना आणि वंचितांना मिळाले नसते. त्यामुळे मंत्रालय हे सत्तेचे सर्वोच्च स्थान आहे. ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र काढले आहेत. त्यामुळे महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेही तैलचित्र असायला पाहिजे, अशी संकल्पना होती. आमचे नवीन सरकार आल्यानंतर या संकल्पनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गती देण्यात आली”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद उपस्थित करणं योग्य नाही – फडणवीस

“कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद हा न्यायालयात आहे. त्यामुळे त्याच्यावर न्यायलय निर्णय देईल. त्यामुळे त्याच्यावर वाद उपस्थित करणं हे दोन्ही राज्यांकरीता योग्य नाही. दोन्ही राज्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही याबाबत बैठक घेतली आणि स्पष्टीकरण दिले आहे”, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

“वीज बिल माफ करू असे मी कधीच म्हटले नव्हते. ज्यावेळेस कोरोना होता, त्या कोरोनाच्या काळापुरता मध्य प्रदेशने वीज बिल स्थगित आणि माफ केले होते. तेच पॅटर्न कोरोना करीता आणा असे सांगितलं होतं. पण तेव्हाचे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार इतके निर्दयी होतं की त्यांनी कोरोनाच्या काळात एका नव्या पैशाची सूट शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार नाही. मविआच्या सरकारने त्या काळात इतके कनेक्शन कट केले आणि आत कोणत्या तोंडाने बोलत आहेत. आम्ही जे बोलतो ते करतोच. त्यामुळे जे बोलत आहेत त्यांनी जनाची आणि मनाची ठेवली पाहिजे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि ‘मविआ’ सरकारवर निशाणा साधला.


हेही वाचा – आमच्या आराध्य दैवतांचा ‘भाजपाच्या आराध्य दैवतां’कडून अपमान; संजय राऊतांचा हल्लाबोल