मोदीजींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास

devendra fadnavis

मुंबई – गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला अभूतपूर्व विजय मिळाला आहे. सर्व प्रकारचे विक्रम भाजपने मोडले आहेत. काँग्रेस सगळयात खालच्या स्कोअरवर गेली आहे. आप या पक्षाचे पुरते बारा वाजले आहेत. मोदीजींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो हा विश्वास गुजरातच्या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे सलग २७ वर्षे राज्य केल्यानंतर इतक्या विक्रमी जागा जेव्हा जनता निवडून देते, याचा अर्थ गुजरातच्या जनतेला हा विश्वास आहे की गुजरातमध्ये जे परिवर्तन झाले ते मोदींनी आणि भाजपने केले. पुढेही भाजपच गुजरातच्या हिताचे निर्णय करू शकते. मोदींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो. हा विश्वास गुजरातच्या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवलेला आहे. गुजरात निवडणुकीत भाजपला ५२ टक्के मते मिळाली. कॉंग्रेस आजपर्यंतच्या इतिहासातील १६ या सगळयात खालच्या स्कोअरवर गेली. ज्यांनी मुख्यमंत्रिपदाचाही उमेदवार घोषित केला आणि आम्ही निवडून येणार असे लेखी दिले, अशा आप नावाच्या पक्षाचे पुरते बारा वाजले. त्यामुळे आप दिल्लीपुरती मर्यादीत पार्टी असल्याचे गुजरातने दाखवून दिल्याचे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडे टोमणेअस्त्र

उद्धव ठाकरेंकडे एक अस्त्र आहे जे ब्रह्मास्त्रापेक्षा प्रभावी आहे. ते म्हणजे ‘टोमणेअस्त्र’. टोमणे मारल्याशिवाय त्यांचे कुठले वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. एकाच गोष्टीचा आनंद आहे, उद्योगाचे महत्व उद्धवजींना कळायला लागले. कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारेच ते आहेत. रिफायनरीसारखा महाराष्ट्रातला प्रकल्प जो देशातला सर्वात मोठ्या गुंतवणूकीचा, रोजगाराचा होता तो उद्धव ठाकरेंनी बाहेर घालवला. त्यामुळे मला असे वाटते की कधीतरी असा विजय मिळाल्यानंतर विरोधी विचाराच्या लोकांचेही तोंडभरून कौतुक करायचे असते. मात्र अजून ते त्या मानसिकतेपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत. अजूनही जे काही महाराष्ट्रात घडले त्याचा परिणाम त्यांच्या मनावर मला दिसतो आहे. मुंबई महानगरपालिकेवर भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि आमचे मित्रपक्ष या आमच्या महायुतीचा झेंडा निश्चितपणे लागेल हा मला विश्वास आहे, असेही फडणवीस म्हणाले.

कर्णाटक बँकेबाबतचा निर्णय आघाडी सरकारचा

कर्णाटक बँकेला अधिकार देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झाल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, खरे म्हणजे अजित पवारांनी नीट माहिती घेतली असती तर त्यांनी हे वक्तव्य केले नसते. दुर्दैवाने अजित पवारच त्यावेळी मंत्री होती. ८ डिसेंबर २०२१ रोजी कर्णाटक बँकेचा राज्य सरकारकडे अर्ज आला.२१ डिसेंबर २०२१ रोजी कर्णाटक बॅंकेशी करारावर स्वाक्षरी झाली. त्यावेळी कोणाचे सरकार होते? ९ डिसेंबर २०२१ ला मविआ सरकारने बंधन बँकेला,इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेला, करुर वैश्य बँक लि,साऊथ इंडियन बँक यांना देखील अशेच खाते हॅंडल करण्याकरता परवानगी दिली आहे. कर्णाटक बँक असेल किंवा उत्कर्ष फायनान्स असेल आमचे सरकार येण्याआधी वर्षभर त्यांनी दिलेले आहे. आता तेच टीका करत आहेत. मला तर आश्चर्यच वाटते. मी त्यांच्यावर यासाठी टीका करणार नाही की या बँकांची नावे काहीही असली तरी त्या वित्तिय संस्था आहेत. त्या नोंदणीकृत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : घराणेशाहीविरोधात जनआक्रोश लोकशाहीसाठी शुभसंकेत, तरुणांना विकास हवाय; पंतप्रधान मोदींचे