रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात सापडला बेपत्ता कोरोनाबाधिताचा मृतदेह!

the body of the missing woman was found in ulhasnagar

एकीकडे मुंबईतल्या शताब्दी पालिका रुग्णालयातून एक ८० वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचा मृतदेह बोरीवली रेल्वेस्थानकावर आढळल्याचं प्रकरण ताजं असतानाच अता जळगावमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. जळगावमधल्या कोरोना विशेष रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या एका कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात कुजलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे फक्त मुंबईच नाही, तर महाराष्ट्रातल्या इतरही ठिकाणी कोरोनाबाधित बेपत्ता होऊन त्यांचे मृतदेह सापडल्याच्या घटना घडत आल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात मृतदेह!

मृत्यू झालेल्या महिला रुग्णाचं वय ८२ वर्ष होतं. या महिलेला भुसावळमधल्या रेल्वेच्या रुग्णालयात १ जून रोजी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. तिथून त्यांना पुढील उपचारांसाठी जळगावच्या रुग्णालयात नेण्यात आलं. २ जून रोजी त्या रुग्णालयातून बेपत्ता झाल्या. नातेवाईकांनी विचारणा केली असता त्या सापडल्या असून चुकून संशयितांच्या कक्षात त्यांना दाखल केल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. दोनच दिवसांनी पुन्हा नातेवाईकांनी फोन केला असता त्या बेपत्ता झाल्याचं नातेवाईकांना कळवण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात सापडला आहे.

या प्रकारानंतर जळगाव रुग्णालयात खळबळ उडाली असून अशा प्रकारचा निष्काळजीपणाच रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची भावना वक्त होत आहे. रुग्ण बेपत्ता झाल्यानंतर त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात पडून राहातो कसा? कुणालाच याची खबरबात कशी लागत नाही? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.