महाराष्ट्रात आढळला जीवघेणा स्क्रब टायफस आजार, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशात आढळतात. मात्र, आता महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातही या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. 

जगभरात कोरोनाचा (Corona Virus) प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अनेक नवनवे आजार आणि रोग नियमित समोर येत आहेत. संपूर्ण जग कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे सुटलेला नसताना आता आणखी एक नवा जीवघेणा आजार महाराष्ट्रात दाखल झाला आहे. स्क्रब टायफस (Scrub Typhus) हा दुर्मिळ आणि जीवघेणा आजार असून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या आजाराबाबत हाय अलर्ट दिला आहे. या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान (Afganistan), पाकिस्तान (Pakistan), जपान(Japan), इंडोनेशिया (Indonesia) आणि रशिया (Russia) या देशात आढळतात. मात्र, आता महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातही या आजाराचे रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा – फायझर लस निर्मात्यासह पत्नीलाही चक्क कोरोनाची लागण, 4 डोस घेऊनही संसर्ग

बुलडाण्यात या आजाराचे नऊ रुग्ण सापडले आहेत. खामगाव तालुक्यात सात रुग्ण असून यातील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिले आहेत. गंभीर असलेल्या रुग्णावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे स्क्रब टायफस?

उंदीर किंवा जंगलातील दाट गवताच्या संपर्कात आल्यावर ओरिएंशिया सुसूगामुशी नावाचा जीवाणू माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर हा आजार होतो. या आजारामुळे मृत्यूचं प्रमाण ३० टक्के असून हा आजार घातक असल्याचं म्हटलं जातंय. हा जीवाणू माणसाच्या शरीरात गेल्यावर ८ ते १० दिवसांनी ताप येऊन अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. या आजारात मेंदूतही ताप जातो, त्यामुळे माणूस बेशुद्ध होऊन मरण पावण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आजार पसरू नये याकरता सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.

काय काळजी घ्याल?

  • खुल्या जागी शौच करणे टाळा.
  • झाडाझुडपात जाताना पूर्ण बाह्याचे कपडे घाला.
  • झाडाझुडपातून घरी आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवावेत.
  • घराजवळ छोटी मठी खुरटी, झाडे, झुडपी असतील ती काढून टाकावीत.
  • या रोगाची लक्षणे चिकनगुनियासारखी असतात.