पवना लेकमध्ये बुडून मुंबईतील प्राध्यापकाचा मृत्यू, सोबत होते वेलिंगकरचेच वरिष्ठ सहकारी

मुंबईतील कुर्ला नेहरूनगरमध्ये वास्तव्यास असलेले वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये सहाय्यक प्राध्यापक प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया (वय वर्षे 62 ) यांचा रविवारी पुण्यात पवना लेकमध्ये बुडून मृत्यू झाला.

Welingkar school
वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे सहाय्यक प्राध्यापक प्रेमप्रकाश भाटिया

पुणे : पुण्यातील पवना लेक कॅम्पेनिंग पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील एका प्राध्यापकाचा बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पवना धरणातील पाणलोट क्षेत्रात माटुंग्यातील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये सहाय्यक प्राध्यापक (assistant professor-rural management) असलेले प्रेमप्रकाश भाटिया लेकमध्ये पोहण्यासाठी उतरले असता रविवारी सकाळी त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. प्रथमदर्शनी भाटिया यांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद स्थानिक पोलिसांनी केली असली तरी त्यांच्यासोबत वेलिंगकरचेच वरिष्ठ सहकारी असल्याने त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.

माय महानगरला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला नेहरूनगरमध्ये वास्तव्यास असलेले वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये सहाय्यक प्राध्यापक प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया (वय वर्षे 62) यांचा रविवारी बुडून मृत्यू झाला. पवना धरण परिसरातील दुधिवरेत भाटिया आणि त्यांचे चार मित्र शनिवारी पर्यटनासाठी आले होते. यादरम्यान, रविवारी 8 जानेवारी 2023 च्या सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वेलिंगकर इन्स्टिट्यूट प्राध्यापक असलेले प्रेमप्रकाश भाटिया पोहण्यासाठी पाण्यात उतरले, भाटिया यांना पाण्याचा अंदाज आला नाही, तसेच अचानक त्यांना दम लागला, जोरजोरात श्वास घेत ते काठावर येण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्याच क्षणी त्यांचा पाण्यात श्वास गुदमरला. लोणावळा ग्रामीण पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रेमप्रकाश भाटिया यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

वेलिंगकर ही पुण्याच्या प्रसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळींची मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ग्रुप डायरेक्टर डॉ. प्रा. उदय नामदेव साळुंखे, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये हायब्रीड लर्निंग सेलचे प्रमुख डॉ. प्रा. राजेश अपरनाथ, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे व्हाईस प्रेसिडेंट एचआर प्रदीप रामनन, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सहाय्यक प्राध्यापक प्रेमप्रकाश भाटिया असा उल्लेख वेलिंगकरच्या वेबसाईटवर आहे. मृत भाटियांसोबत वेलिंगकरचे हे तीनही वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. तसेच, त्यांच्यासोबत शिवसेनेच्या युनियनचे वरिष्ठ पदाधिकारी संतोष चाळके हेही पर्यटनासाठी पुण्यात आले होते. शिवसेनेच्या संतोष चाळके यांच्या बंगल्यावरच हे पाचही जण थांबले असल्याची माहिती आपलं महानगरला मिळाली आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या बंगल्यात होते वास्तव्यास

पाच मित्रांचा एक गट आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी लोणावळ्याला गेला होता. ते शनिवारी लोणावळ्यात आले आणि मावळातील दुधिवरे परिसरातील लेक व्ह्यू सोसायटीत शिवसेनेचा पदाधिकारी असलेले संतोष चाळके या मित्राच्या बंगल्यावर थांबले. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या पवना धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. प्रेमप्रकाश भाटिया पाण्यात पोहत असताना श्वास गुदमरला. पवना लेकच्या बॅकवॉटरच्या किनाऱ्यावर परतण्याच्या प्रयत्नात ते प्रेमप्रकाश बुडाले, असे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले. त्यांच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मृतदेहाची शवविच्छेदन करण्यात आले आणि शवविच्छेदनामध्ये बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. प्रेमप्रकाश भाटिया यांचा मुलगा दुर्घटनेनंतर घटनास्थळी आला आणि त्याच्याकडे त्यांचा मृतदेह सुपूर्द करण्यात आल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली हवालदार विजय गाले यांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केल्यानंतर शिवदुर्ग संस्थेचे पथक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. शिवदुर्ग संस्थेच्या पथकातील महेश मसने, राजेंद्र कडू, प्रणय अंबुरे, सागर कुंभार, कपिल दळवी, सतीश आहेर यांनी भाटिया यांना पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पोलिसांनी स्थानिक बचाव पथकासह शोधमोहीम सुरू केली आणि दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचाः भारत जोडो यात्रा : राकेश टिकैतसह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राहुल गांधींची भेट