मुंबई : मागील काही दिवसांपासून मराठवाडा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. मराठवाड्यातील या ना त्या घटनेवरून हे दिसून येत असतानाच मागील काही तासांमध्ये मराठवाड्यातील नांदेडसह औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध कारणाने रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. यामध्ये नांदेडमध्ये आतापर्यंत 35 रुग्णांचा तर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात आतापर्यंत दहा रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने मराठवाड्यातील हे मृत्यूसत्र थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. (Death spree continues in Marathwada 45 patients have died so far in Aurangabad along with Nanded)
मागील काही दिवसांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही घटना नांदेडमध्ये मागील 48 तासांत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 16 नवजात बाळांचा समावेश आहे. या भयंकर घटनेनंतर औरंगाबादमध्येही मागील 24 तासांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मृत्यूचे तांडव थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दुर्दैवी घटनेबाबत आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी आम्ही त्यांना रुग्णालयातील परिस्थितीबाबत विस्तृत… pic.twitter.com/t8HgLfxhqk
— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 3, 2023
हेही वाचा : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
घाटीत दाखल होतात एवढ्या जिल्ह्यातील रुग्ण
औरंगाबादचे घाटी हे शासकीय रुग्णालयात मराठवाड्यातील सर्वांत मोठे शासकीय रुग्णालय आहे. जवळपास 14 ते 16 जिल्ह्यातील रुग्ण या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी येतात. त्याचबरोबर या रुग्णालयामध्ये पुढचे 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : राज्यातील 2300 ग्रामंपचायतीच्या निवडणुकांचा धुरळा; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
अशोक चव्हाणांनी ट्वीट करत दिली वाढत्या मृत्यूची माहिती
कॉंग्रेसच ज्येष्ठ आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज ट्वीट करत नांदेडमध्ये वाढत्या मृत्यू संख्येबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दुर्दैवी घटनेबाबत आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी आम्ही त्यांना रुग्णालयातील परिस्थितीबाबत विस्तृत माहिती दिली. रुग्णालयाची आरोग्यसेवा प्रभावी करण्यासाठी अनेक तात्कालिक व दीर्घकालीन उपाय सुचवले. दोन्ही मंत्र्यांनी आमच्या भावना जाणून घेतल्या असून, त्यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या रुग्णालयातील बळींची संख्या 35 वर गेल्याची माहिती दिली. यामध्ये एकूण 16 बालकांचा समावेश आहे.