मुंबई : मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या घरगुती, लहान स्तरावरील डेब्रिज नेण्यासाठी ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन सेवेला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसात पालिकेकडे 150 लोकांनी संपर्क साधला आहे, अशी माहिती उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. (Citizens’ great response to ‘Debris On Call’ online service.)
हेही वाचा : Solapur Police : एसी डब्यातून तस्करी; पोलिसांनी विशाखापट्टणम एक्सप्रेसमधून जप्त केला 35 किलो गांजा
मुंबई शहर आणि उपनगरे येथील विविध ठिकाणी अनेक जुन्या इमारती पाडून नव्याने इमारती उभारणे, झोपडपट्टीत घरांची दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे लहान मोठ्या प्रमाणात त्यातून डेब्रिज निर्माण होते. हे डेब्रिज अनेकदा रस्त्यावर, पदपथावर अथवा मोकळ्या जागेत कुठेही टाकून देण्यात येते. त्यामुळे एक प्रकारे त्या डेब्रिजच्या रूपाने कचऱ्यात आणखी भर पडते. महापालिकेला सदर डेब्रिज उचलण्यासाठी वेगळी वाहन व यंत्रणा, मनुष्यबळ व्यवस्था उपलब्ध करावी लागते. एवढेच नव्हे तर त्या डेब्रिजची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा पुढील व्यवस्था करावी लागते. त्यावर महापालिकेने 2014 मध्ये ‘डेब्रिज ऑन कॉल ‘ ही सेवा उपलब्ध केली. मात्र त्यासाठी महापालिका काही प्रमाणात शुल्क आकारते. मात्र त्यानंतरही डेब्रिज कुठेही टाकून देण्याचे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. त्यामुळे आता महापालिकेने ‘डेब्रिज ऑन कॉल’ ही ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे.
हेही वाचा : Raigad News : भरमसाठ मालमत्ता करामुळे खालापूरकर संतप्त, थेट नगरपंचायत कार्यालयावर धडक
घरगुती दुरुस्तीच्या माध्यमातून निर्माण होणारे किमान 500 किलो डेब्रिज वाहून नेण्याची सेवा मोफत उपलब्ध केली आहे. मात्र 500 किलो पेक्षाही जास्त वजन असलेले डेब्रिज उचलण्यासाठी माफक शुल्क आकारण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने गुरुवारी दिली आणि शुक्रवारी सकाळपासूनच महापालिकेकडे 150 लोकांनी ऑनलाईन कॉल सेवेद्वारे संपर्क केला. त्यामुळे पालिकेच्या या नवीन डेब्रिज मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Edited By Komal Pawar Govalkar