ठरलं! शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब

eknath shinde

मुंबई – शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर शिवसेनेच्या सर्वोच्च पदावर कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याबाबत आज राष्ट्रीय कार्यकारिणींची बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आजची कार्यकारिणी पार पडली, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. कार्यकारिणी बैठक पार पडल्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याचा अर्थ शिवसेनेच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच शिवसेनेचे मुख्यनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसंच, येत्या काळात शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवून दिलेल्या उद्दीष्टानुसार युतीबाबतचा निर्णय यापुढे घेतला जाणार आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे होते. त्यांचा कार्यकाळ २१ जानेवारी रोजी संपला. त्यानंतर, निवडणूक आयोगाने निकाल देत शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. त्यामुळे शिवसेनेचा पुढचा मुख्यनेता कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेची (शिंदे गट) आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच, अनेक प्रस्तावही ठेवण्यात आले. त्यानुसार, पक्षाविरोधी कारवाया रोखण्यासाठी शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी दादा भुसे असणार आहेत. तर, संजय मोरे आणि शंभूराज देसाई सदस्य असणार आहेत.

धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षनाव मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचं पालन करण्याच्या सूचना शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदार, मंत्र्यांना केल्या आहेत.

तसंच, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं संवर्धन होण्याकरता पुढाकार घेऊन शासनाला त्याकेड प्रस्ताव पाठवण्यात येणार अससल्याचा ठराव करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट स्थानकाला चिंतामणराव देशमुख नाव देण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. प्राचीन इतिहास असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता प्रयत्न करणार असल्याचंही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

तसेच, राज्यातील तरुण वर्ग स्पर्धा परिक्षांकडे वळावेत याकरता ग्रामीण भागातील काना-कोपऱ्यात प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा झाली. तर बाळासाहेबांच्या विचारानुसार युती कोणासोबत करावी आणि कोणासोबत करू नयेत ही उद्दीष्ट पाळणार असल्याचंही उदय सामंतांनी आज सांगितलं.

या मुद्द्यांवर झाली चर्चा

  • भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार वि.दा.सावरकर यांना द्यावा अशा ठराव मांडला
  • स्थानिक लोकांना उद्योगात ८० टक्के लोकांना प्राधान्य देण्याचा ठराव
  • वीरमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांची नावं राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत यावी
  • पक्षाविरोधी कारवाया होऊ नये म्हणून शिस्तभंग समितीची स्थापना
  • निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचं पालन करण्याच्या मंत्र्यांना सूचना
  • गडकिल्ल्यांचं संवर्धन होण्याकरता पुढाकार
  • चर्चगेट स्थानकाला चिंतामणराव देशमुख नाव देण्याचा प्रस्ताव
  • मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा
  • राज्यातील तरुण वर्ग स्पर्धा परिक्षांकडे वळावेत याकरता ग्रामीण भागातील काना-कोपऱ्यात प्रशिक्षण वर्ग सुरू करणार
  • बाळासाहेबांच्या विचारानुसार युती कोणासोबत करावी आणि कोणासोबत करू नयेत ही उद्दीष्ट पाळणार