घरमहाराष्ट्रनवीन मुठा कालव्याच्या दुरुस्तीबाबत लवकरच निर्णय - विजय शिवतारे

नवीन मुठा कालव्याच्या दुरुस्तीबाबत लवकरच निर्णय – विजय शिवतारे

Subscribe

पुण्यातील नवीन मुठा उजवा कालव्याच्या दुरुस्तीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानसभेत सांगितले आहे. त्यामुळे आता लकरच नवीन मुठा उजवा कालवा दुरुस्त होणार आहे.

पुण्यातील नवीन मुठा उजवा कालव्याला दोन महिन्यांपूर्वी भगदाड पडून झालेल्या दुर्घटनेमुळे आठशेहून अधिक घरे बाधित झाली आहेत. या कालव्याचे अस्तरीकरण तसेच सर्वंकष दुरुस्तीबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या आगामी बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानसभेत सांगितले आहे. सदस्य ॲड. राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. जलसंपदा विभागाच्या अधीनस्त प्रकल्पांच्या विस्तार आणि सुधारणा, विशेष दुरुस्तीसाठी मंजूर योजनांतर्गत अनुदानाच्या दोन टक्के निधी यापूर्वी ठेवला जात होता. मात्र शासनाने मंगळवारी याबाबत नवीन निर्णय केला असून त्यानुसार दहा टक्क्यांपर्यंत निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन मुठा कालव्याच्या दुरुस्तीसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यामुळे लवकरच नवीन मुठा कालव्याच्या दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

नवीन मुठा कालव्यातून पुणे शहराला पाणी पुरवठ्यासाठी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वर्षाचे बाराही महिने २४ तास पाणी सुरू असते. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीला वाव मिळाला नाही. पुणे महानगरपालिकेने एक महिना कालवा बंद ठेवण्यासाठी मान्यता दिल्यास कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे सोपे होईल. सिंचनासाठीचे कालवे बंद पाईप लाईन करण्याबाबत शासनाची भूमिका असून याबाबतही पुढील काळात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. असे देखील ते म्हणाले.

- Advertisement -

तीन कोटी नुकसान भरपाई

नवा मुठा उजवा कालवा फुटून घडलेल्या दुर्घटनेत ७३० कुटुंबे अंशत: तर ९० कुटुंबे पूर्णत: बाधित झाली आहेत. पूर्णत: बाधित झालेल्यांना प्रति कुटुंब अकरा हजार रुपये तर अंशत: बाधित कुटुंबांना पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तीन कोटी रुपये नुकसान भरपाई वितरण करण्याचे काम सुरू आहे. बाधित कुटुंबांची दुर्घटनेमध्ये वाहून गेलेली कागदपत्रे पाहता त्यांना नवीन दाखले वितरीत करण्याबाबत जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका प्रशासनाला शिबीरे भरविण्याच्या सूचना देखील देण्यात येतील असेही शिवतारे यावेळी म्हणाले. या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य अजित पवार, माधुरी मिसाळ यांनी देखील सहभाग घेतला होता.


वाचा – पुणे कालवा फुटीप्रकरणी अहवाल १५ डिसेंबरपर्यंत!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -