अक्कलकोटमधील ११ पैकी ३ गावांचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे

अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २८ गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी स्थानिक विकासाच्या प्रश्नाचे निमित्त पुढे करत कर्नाटकात सामील होण्याची मागणी केली होती. या गावांनी मंजूर केलेल्या ठरावासह जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले होते. परंतु अक्कलकोटमधील ११ पैकी ३ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे. दारसंग, कलकर्जाळ आणि केगाव बुद्रुक अशा या तीन गावांची नावे आहेत.

कलकर्जाळ, शेगाव, हिळ्ळी, कोर्सेगाव, कांदेवाडी खुर्द, आळगी, मंगरूळ, धारसंग, शावळ, देवीकवठे आदी. गावांनी कर्नाटकात सामील होण्याची मागणी करणारे ठराव संमत करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले होते. सीमा भागातील या गावांमध्ये स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांपासून पायाभूत विकास झाला नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी मांडली होती. परंतु गावातील विकासकामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

गावकऱ्यांचं म्हणणं काय?

गावात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यात न आल्यामुळे आम्ही महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही घोषणाबाजीही केली होती. पण पायाभूत आणि मुलभत सुविधेविषयी आम्ही आमच्या आमदारांसोबत चर्चा केली. त्यानंतर आमदारांनी सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा देणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेलं मागणीचं निवेदन मागे घेतलं आहे, असं गावकरी म्हणाले.

महाराष्ट्रातील १०० गावे दुसऱ्या राज्यात जाण्याच्या तयारीत

नागरी विकास, सोयी सुविधांच्या अभावामुळे नाराज ग्रामस्थांनी दुसऱ्या राज्यात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्यातील जवळपास १०० गावे दुसऱ्या राज्यात विलीन व्हावीत म्हणून ग्रामस्थांकडून शासनाला रितसर निवदेन करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सोलापुरातील पाणी प्रश्न पेटल्याने तेथील नागरिक कर्नाटकात सामील होण्यास राजी असल्याचा दावा कर्नाटकटचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. तेव्हापासून राज्यात बराच वादंग सुरू आहे. त्यातच, याप्रश्नी चर्चा करण्यापेक्षा दोन्ही राज्यातील नेते एकमेकांवर आगपाखड करत असल्याने समस्या आणखी बिकट बनत चालली आहे. दरम्यान, राज्यातील आणखी १०० गावे आजूबाजूच्या सीमांलगत असलेल्या राज्यात इच्छूक असल्याचं समोर आलं आहे.


हेही वाचा : महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती