मुंबई : बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख संशयित आरोपी म्हणून वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सत्ताधारी आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विरोधातील नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असे असले तरी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिल्लीत होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर धनंजय मुंडे हे सुद्धा दिल्लीत गेले आहेत. (Decision on Dhananjay Munde’s resignation likely to be taken in Delhi)
अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच्या आर्थिक संबंधाचे पुरावे दिले होते. यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देत त्यांनाही पुरावे दिले. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र मंगळवारी (28 जानेवारी) धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यानंतर अजित पवार यांनीही संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी सांगितले की, अंजली दमानिया यांनी दिलेल्या पुराव्याची सत्यता पडताळण्यात येणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र आज देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेल्यावर त्यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे हे सुद्धा गेले आहेत.
हेही वाचा – Sandeep Kshirsagar : धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्यच, संदीप क्षीरसागरांनी सांगितले कारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून 31 जानेवारीपर्यंत असे तीन दिवस दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. ते आज दिल्लीतील डीसी चौक, सेक्टर 9 रोहिणी येथे भाजपा उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. त्यानंतर ते पहाडगंज भागात मराठी प्रकोष्ठ बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर धनंजय मुंडे हे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर दिल्लीत काही निर्णय होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
हेही वाचा – Mohite Patil : रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या अडचणीत वाढ, भाजप मोठी ‘अॅक्शन’ घेण्याच्या तयारीत