मुंबई : “जुडेगा भारत… जितेगा इंडिया”चा नारा देत देशातील 28 पक्ष हे भाजप विरोधात लढा देण्यासाठी एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीची बैठक कालपासून (ता. 31 ऑगस्ट) सुरू झाली असून या बैठकीचा आजचा (ता. 01 सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल असलेल्या ग्रँड हयात मध्ये ही बैठक पार पडत आहे. काल या बैठकीमध्ये इंडियाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार होते. परंतु काही कारणास्तव हे अनावरण आज करण्यात येणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आज सकाळी साधारणतः 10.15 वाजण्याच्या सुमारास इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर सकाळी 10.30 ते 02.00 या वेळेत इंडियाची बैठक होणार आहे. तर दुपारी 3.30 वाजता इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. (decision regarding the post of coordinator will be made on the second day of the INDIA alliance meeting)
हेही वाचा – इंडिया आघाडीचे भोजनभाऊ !
गेल्या महिन्याभरापासून इंडिया आघाडीच्या या बैठकीची चर्चा करण्यात येत होती. त्यानुसार ही बैठक आता मुंबईमध्ये पार पडत आहे. परंतु या इंडिया आघाडीचे समन्वयक पद कोण भूषविणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या समन्वयक पदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. समन्वयक पदी महाराष्ट्रातील एखाद्या नेत्याची निवड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली असली तरी अद्यापही कोणतीही माहिती इंडिया आघाडीकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये समन्वयक पदा सोबतच इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर देखील चर्चा केली जाणार आहे.
आगामी सर्व निवडणुका इंडिया आघाडी एकत्रित लढणार असल्याकारणाने यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तर 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटपाबाबत पूर्ण चर्चा करून ते जाहीर करणे आणि निवडणुकीच्या प्रचारासाठीची योग्य नेते ठरवणे हा या आजच्या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. देशात ‘एक देश, एक निवडणूक’ असा अध्यादेश निघण्याची शक्यता असताना इंडिया आघाडीच्या या बैठकीत याबाबत देखील चर्चा होऊ शकते.
विरोधकांच्या आघाडीचे ही तिसरी बैठक आहे. पहिली बैठक पाटणा, दुसरी बैठक बंगळुरू आणि तिसरी बैठक ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पार पडत आहे. त्यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व आहे. या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर ग्रँड हयात हॉटेलमधील 280 खोल्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे काल दुपारी या बैठकीसाठी पोहोचले. बैठकीला आलेल्या सर्व नेत्यांचे ढोल-ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
इंडिया आघाडीच्या या बैठकीवर सत्ताधाऱ्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. काल या बैठकीसाठी नेते मुंबईत दाखल होत असतानाच शिवसेनेकडून (शिंदे गट) पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही तासांच्या बैठकीसाठी करोडो रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्यामुळे हा पैसा नेमका आला कुठून याबाबत त्यांनी खुलासा करावा? असे देखील आव्हान उदय सामंत यांच्याकडून करण्यात आले. तर, उद्यय सामंत त्यांना प्रत्युत्तर करत विरोधकांच्या नेत्यांनी देखील त्यांना धारेवर धरले. 50 कोटींचे केले काय आणि बंडखोरी केल्यानंतर गुवाहाटी, सुरत, गोवा इथला खर्च नेमका कोणाकडून करण्यात आला? याबाबत अधिक शिंदे गटाने खुलासा करावा, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे सध्या तरी इंडिया आघाडीच्या बैठकीची चर्चा होत असताना सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या टीकांनी देखील सर्वांचेच लक्ष वेधले आहे.