मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहीनी म्हटली जाणाऱ्या एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव , राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या 276 व्या बैठकीत एसटीला भाडेवाढ करण्यास मंजूरी मिळाली. त्यापाठोपाठ रिक्षा-टॅक्सीच्या दरातही भाडेवाढ करण्यात आली होती. यानंतर आता शालेय बसच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय शालेय बस संघटनेने घेतला आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. (Decision to increase school bus fare by 18 percent)
स्कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांनी शालेय बसभाडे वाढीचं कारण एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे. त्यांनी म्हटले की, शालेय बस उत्पादकांकडून बस आणि सुट्या भागांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बसचा देखभाल खर्च महागला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी चांगली सेवा आणि सुरक्षित नियमांचे पालन करण्यासाठी चालक, महिला मदतनीस आणि व्यवस्थापकांना पगारवाढ द्यावी लागते. याशिवाय पार्किंग शुल्क दुप्पट झाले आहे. तसेच आरटीओचा दंड देखील वाढल्याने खर्चात आणखी भर पडली आहे. त्यामुळे या सर्व वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी 18 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून अर्थात 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार असल्याची माहितीही गर्ग यांनी दिली.
हेही वाचा – Eknath Shinde : लोकांचा म्हाडाच्या घरावर विश्वास वाढतोय, शिंदेंकडून भावना व्यक्त
बेकायदा वाहतुकीला आळा घातल्यास दरवाढ रद्द करणार
अनिल गर्ग म्हणाले की, मुंबईसह राज्यात शालेय बसव्यतिरिक्त रिक्षा, टॅक्सींमधूनही विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. परंतु ही वाहतूक बेकायदा आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध वाहनांवर बंदी घालावी. जर असे झाले तर वाढीव वाहतूक रद्द करण्यात येईल, असे अनिल गर्ग यांनी स्पष्ट केले.
एसटी, रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ
परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव , राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या 276 व्या बैठकीत एसटीला 14.95 टक्के भाडे वाढ करण्यास मंजूरी मिळाली. त्यापाठोपाठ रिक्षा आणि टॅक्सीचीही 1 फेब्रुवारीपासून 3 रुपयांनी भाडेवाढ करण्यात आली. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते की, डिझेल आणि सीएनजीचे दर वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित असते. गेल्या तीन-चार वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्यानं एकत्रितपणे 14.97 टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा – Mahayut News : अजितदादा अन् शिंदेंच्या पालकमंत्र्यांवर राहणार आता भाजपचा ‘वॉच’, घेतला ‘हा’ निर्णय