घरमहाराष्ट्रराज्यात ओला दुष्काळ?

राज्यात ओला दुष्काळ?

Subscribe

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे सूतोवाच, गुलाब चक्रीवादळाच्या पावसाचा ७ हजार कोटींचा फटका

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीत सुमारे ७ ते ८ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढच्या आठवड्यात होणार्‍या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे सूतोवाच बुधवारी केले.

गेल्या दोन दिवसात मराठवाड्यातील १० पैकी ७ जिल्ह्यांत १७० ते १८० मिमी पाऊस पडला. तसेच यंदा पावसाळ्यात तब्बल ४३६ नागरिकांचा बळी गेला. त्यात १९६ नागरिक वीज पडून मृत्यू पावले. सप्टेंबर महिन्यात ७१ लोकांचा जीव गेला असून २६ नागरिक जखमी झाले आहेत. तर ९६ मोठ्या जनावरांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisement -

यंदाच्या पावसाळ्यात राज्यात तब्बल १७ लाख हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले आहे. पैकी ८१ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. संपूर्ण पंचनामे झाले तर नुकसानीच्या क्षेत्राचा आकडा २२ लाख हेक्टरवर जाईल. तौक्ते चक्रीवादळासाठी २०३ कोटीचा केंद्राला प्रस्ताव पाठवला होता. जुलैमधील पूराच्या नुकसान भरपाईसाठी १ हजार ६७९ कोटीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र केंद्राची काहीच मदत आली नाही, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

२०२० च्या निसर्ग चक्रीवादळाच्या भरपाईपोटी केंद्राकडे १ हजार ६५ कोटीची मदत मागितली होती. मात्र केंद्राने फक्त २६८ कोटीची मदत दिली. मागच्या वर्षी महाविकास आघाडीच्या सरकारने १० हजार ५०० कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. पैकी ७ हजार ५०० कोटीची मदत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिली आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील कोणते जिल्हे गुलाब चक्रीवादळाच्या अतिवृष्टीने बाधित झाले आहेत, याची माहिती महसूल यंत्रणेकडून गोळा केली जात आहे. दोन दिवसात पाऊस थांबल्यावर पालकमंत्री संबंधित जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्रीसुद्धा पाहणी दौरा करतील, असे सांगून नुकसानग्रस्त शेतपिकाचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -