घरताज्या घडामोडीशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, दीपक केसरकरांचे प्रतिपादन

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, दीपक केसरकरांचे प्रतिपादन

Subscribe

महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाद्वारे विविध महत्वाकांक्षी योजना राबवून शिक्षण क्षेत्रात आदर्श कार्य करत आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

महापालिकेचे सन २०२१-२२ चे “आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार” ५० आदर्श शिक्षकांना मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी रोजी भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात आयोजित समारंभात प्रदान करण्यात आले. त्यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मार्गदर्शन करताना केसरकर बोलत होते. यावेळी, ५० पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रत्येकी रुपये १० हजार, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह तसेच शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले.

- Advertisement -

याप्रसंगी, आमदार यामिनी जाधव, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उप आयुक्त (शिक्षण) केशव उबाळे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपसंचालक (शिक्षण) संदीप संगवे आदी मान्यवर उपस्थित होते.

देशात उच्च शिक्षण मातृभाषेत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मातृभाषेत ग्रहण केलेले शिक्षण हे अधिक प्रभावीपणे समजते. या अनुषंगाने पुढील वर्षी जून महिन्यापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध होणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. येत्या काळात वैद्यकीय शिक्षण, सनदी लेखापाल (सीए) यासारखे उच्च शिक्षणही मराठीत घेता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

शिक्षणासोबत विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासाठी चित्रकला, नाटक, गायन इत्यादी कलांमध्ये पारंगत असलेल्या तज्ज्ञ मंडळीद्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रयोग शिक्षण विभाग राबवणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच स्रोत कमी असतानाही विद्यार्थी संख्या वाढवण्यास योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव यशकथा प्रसिद्ध करून करण्यात येणार आहे. यासाठी द्वैमासिक प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी, बोलताना आमदार यामिनी जाधव यांनी, आदर्श महापौर शिक्षक पुरस्कार उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, मुंबई महापालिकेच्या वतीने सन १९७१ मध्ये आदर्श महापौर पुरस्कार प्रदान करणे, ही परंपरा सुरू करण्यात आली. त्यावर्षी २ आदर्श शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सन २०२२ मध्ये ५० आदर्श शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो, ही बाब कौतुकास्पद.

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात शिक्षकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक चांगला माणूस आणि उत्तम नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षक अत्यंत परिश्रम घेऊन करतात. याची पोचपावती म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार वितरित करण्यात येतो.
मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिक्षणाद्वारे समाजाची प्रगती साधता येते यासाठी या वर्गाला उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचे कार्य महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळा आणि शिक्षक करत आहेत.

या अंतर्गत दरवर्षी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू, सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण, डिजीटल आणि व्हर्च्युअल क्लासरूम, खगोलीय प्रयोगशाळा, संगणकीय प्रयोगशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मात्र, या सर्व सुविधा प्रदान करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य आहे असे नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. अशाप्रकारे शिक्षक जेव्हा सर्व सुविधांचा फायदा घेऊन ज्ञानदान करतील, त्यावेळेस विद्यार्थ्यांचे जीवन घडेल, असे मत श्रीमती भिडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुकही केले. उपायुक्त (शिक्षण) श्री. केशव उबाळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा मांडली.


हेही वाचा : खोके गॅंग महाराष्ट्रद्वेषी; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -