‘या’ मेळाव्याच्या तिपटीने आम्ही दसरा मेळावा घेऊ आणि.., दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य

deepak kesarkar

शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार?, यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात वाद सुरू होता. अखेर हायकोर्टाने निर्णय देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यांना परवानगी दिल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. दरम्यान या मेळाव्याबाबत शालेय शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ज्यांनी प्रथम अर्ज केला त्यांना प्रथम परवानगी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठरवले असते तर हा मेळावा होऊ दिला नसता. मात्र, मुख्यमंत्री जनतेचा आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा आदर राखला आहे. या मेळाव्याच्या तिपटीने आम्ही दसरा मेळावा घेऊ आणि बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटू, असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांचे विचार पुन्हा एकदा जागृत करू. देवीचे मनापासून पूजन करायचे असते. देव शेवटी भक्तीचा भुकेला असतो. यात राजकारण आणायचे नसते.

दसरा हा विचारांचे सोने लुटायचा दिवस असतो. जे विचार बाळासाहेब देत असत. त्या विचारांशी आम्ही प्रामाणिक आहोत. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारासोबत आम्ही राहु, यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्थान नसेल. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यास जाण्याचा आग्रह आमच्यासोबत असलेले काही शिवसैनिक घेत आहेत. मात्र त्या गटाच्या मेळाव्याला जायचे की नाही, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं केसरकर म्हणाले.


हेही वाचा : ‘हा’ आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप