घर महाराष्ट्र महायुतीकडून INDIA आघाडीच्या नेत्यांचे स्वागत पण...; दीपक केसरकरांनी स्पष्ट केली भूमिका

महायुतीकडून INDIA आघाडीच्या नेत्यांचे स्वागत पण…; दीपक केसरकरांनी स्पष्ट केली भूमिका

Subscribe

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचे आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो, कारण तशी परंपरा आहे. परंतु, त्यांनी येऊन सरकारबाबत कोणतीही टिप्पणी करू नये, असे दीपक केसरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या विरोधकांच्या आघाडीची म्हणजेच ‘INDIA’ ची बैठक आज (ता. 31 ऑगस्ट) आणि उद्या (ता. 01 ऑगस्ट) मुंबईत पार पडत आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून देखील ‘महामंथन’ या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीने बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु या बैठकीआधी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार दीपक केसरकर आणि खासदार गजानान किर्तीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट केली. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचे आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो, कारण तशी परंपरा आहे. परंतु, त्यांनी येऊन सरकारबाबत कोणतीही टिप्पणी करू नये, असे दीपक केसरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Deepak Kesarkar made a big statement about leaders coming for meeting of INDIA Alliance)

हेही वाचा – बाळासाहेब हिंदू शेर म्हणून लोकप्रिय होते तर…, इंडिया बैठकीवरून भाजपाची बोचरी टीका

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरे पायदळी तुडवत आहेत. उद्धव ठाकरेंना पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले असते तर त्यांनी युती तोडली असती का?, असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की, 2014 मध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले नव्हते, त्यावेळी शरद पवार यांनीच भाजपला बाहेरुन कोणत्याही शर्तीशिवाय पाठिंबा दर्शवला होता. इंडिया आघाडीचे आलेले नेते बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन त्यांना वंदन करणार आहेत का? सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे का? अशी टीका त्यांनी केली.

तसेच, जगभरातील लोक गुंतवणूकीसाठी भारताकडे बघत आहेत. भारताची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सूरू झाली आहे. सर्वसामान्य माणूस सुखी व्हायला लागला असताना विरोधकांना लोकशाही आठवली. लोकशाही असल्यानेच तुमची सरकारे काही राज्यात आल आहेत. युपीए वरून इंडिया का झाले? भारताच्या जनतेने तुम्हाला कधीही स्वीकारले नाही. भारताची संस्कृती तुम्हाला मान्य नाही. 370 कलम हटवणे तुम्हाला मान्य नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसने भ्रष्टाचार केला आणि त्यामुळेच युपीए नाव बदनाम झाले. सध्या लोक तीच आहेत फक्त नावं बदलले आहे, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला आहे.

- Advertisement -

त्यांनी जनतेसाठी आपआपल्या राज्यात काम करावे. भारताची प्रगती थांबली तरी चालेल पण मोदींसारखा सक्षम नेता नको, अशी भूमिका कोणी घेत असेल तर हे भारताला मान्य नाही. ज्या महाराष्ट्राचा स्वाभिमान बाळासाहेबांनी जागृत केला त्या बाळासाहेबांच्या मुंबईत सुरू असलेली लाचारी आम्हाला मान्य नाही. ही लाचारी महाराष्ट्राला मान्य आहे का? असे प्रश्न उपस्थित करत केसरकरांनी हल्लाबोल केला.

इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये जे जे मुद्दे येतील, त्या सर्व मुद्द्यांना महायुतीकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनेक देश भारतामध्ये गुंतवणूक करत आहे, ज्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे. त्यामुळे मोदींच्या आड येण्याचा अधिकार कोणालाही नाही. म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे कोणत्याही आलेल्या नेत्याबद्दल आम्ही काही वाईट बोलणार नाही. परंतु, जर का त्यांनी देशाच्या विरोधातील किंवा राज्याच्या विरोधातील विधान केले तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा देत केसरकर पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने मविआने पत्रकार परिषद घेतली, ती जनतेची दिशाभूल करणारी होती. केवळ स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी महाराष्ट्रात ही धडपड सुरू आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

- Advertisment -