एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राज्यपाल सी. पी. राधकृष्णन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे कार्यभार सोपावला आहे. त्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यातच शिवसेनेचे ( शिंदे गट ) नेते, दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री कोण होणार? कधी नवं सरकार स्थापन होणार? याची माहिती दिली आहे. ते राजभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांना कारभार पाहण्यासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितलं आहे. येत्या काही दिवसांत नवीन सरकार स्थापन होईल. बुधवारी भाजपच्या गटनेतेपदाची निवड होण्याची शक्यता आहे. यानंतर तीनही नेते एकत्र बसून चर्चा करतील. पक्षश्रेष्ठी सांगतील त्यानुसार महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल.”
हेही वाचा : शिंदे अन् ठाकरे 51, तर शरद पवार विरुद्ध अजितदादांचे उमेदवार 40 जागांवर भिडले; कोण ठरलं वरचढ?
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतं का? या प्रश्नावर केसरकर यांनी म्हटलं, “आपला मुख्यमंत्री व्हावा, असं प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात. परंतु, नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो तीनही पक्षांच्या नेत्याला मान्य असेल.”
“मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर बाब आहे. सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो. त्यानंतर काळजीवाहून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली आहे,” असं केसरकर यांनी सांगितलं.
मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे नाराज? हा प्रश्न विचारल्यावर केसकरांनी म्हटलं, “ते बिलकूल नाराज नाहीत. जो निर्णय घ्याल, तो मान्य असेल, असं एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ नेत्यांना बोललं आहे.”
हेही वाचा : “बारामती लढली नसती, तर वेगळा संदेश गेला असता”, शरद पवारांच्या विधानावर अजितदादा म्हणाले, “माझ्या भावाच्या…”